Lok Sabha Election Result 2024: नवी दिल्ली : देशभरातील लोकसभा निवडणुकांचे निकाल (Lok Sabha Election Result 2024) जाहीर झाले आहेत. 2014 नंतर पहिल्यांदाच भाजप (BJP) 272 च्या आकड्यापासून दूर राहिली आहे. अशातच इंडिया आघाडीच्या (Indian Alliance) नजरा भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (NDA) भाग असलेले तेलुगू देसम पार्टी (TDP) चे अध्यक्ष एन चंद्राबाबू नायडू यांच्यावर खिळल्या आहेत. अशातच आज निकालाच्या दुसऱ्याच दिवशी एनडीए आणि इंडिया आघाडीच्या दिल्लीत बैठका पार पडणार आहेत. दरम्यान, एन चंद्राबाबू नायडू यांनी दिल्लीत सरकार स्थापनेबाबत चर्चा करण्यासाठी बुधवारी (5 जून 2024) होणाऱ्या एनडीएच्या बैठकीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे पत्रकार परिषदेत बोलताना चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. चंद्राबाबू म्हणाले की, "काळजी करू नका. तुम्हाला बातमी हवी आहे. देशात अनेक राजकीय बदल होताना मी पाहिले आहेत, पण मी एनडीएमध्येच राहणार आहे. एनडीएच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मी दिल्लीला जात आहे."
आंध्र प्रदेश (Andhra Pradesh)विधानसभा निवडणुकीतील विजय आणि लोकसभा निवडणुकीत टीडीपीच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांनी मतदारांचे आभार मानले आणि आम्ही एनडीएमध्येच राहू असं स्पष्ट केलं आहे.
भाजपसाठी टीडीपीचा पाठिंबा का महत्त्वाचा?
आंध्र प्रदेशच्या 175 जागांच्या विधानसभेत टीडीपीला 135 जागा, पवन कल्याणच्या जनसेनेला 21 आणि भाजपला 8 जागा मिळाल्यात. याशिवाय टीडीपीनं लोकसभेच्या 16 जागा जिंकल्या आहेत. त्याचवेळी लोकसभा निवडणुकीत भाजपनं 240 जागा जिंकल्या आहेत. अशा परिस्थितीत सरकार स्थापन करण्यासाठी टीडीपीचा पाठिंबा आवश्यक आहे. अशा परिस्थितीत चंद्राबाबू नायडू यांची भूमिका स्पष्ट केल्यानं भाजपला केंद्रात सरकार स्थापन करणं सोपं होईल.