मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडले. आता सर्वांचे 4 जून रोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे लक्ष लागले आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडताच वेगवेगळ्या माध्यम संस्थांनी त्यांचे एक्झिट पोलचे (Exit Poll) आकडे जाहीर केले आहेत. या आकड्यांनुसार यावेळच्या लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए (NDA) बाजी मारण्याची शक्यता आहे. दरम्यान, मतदानाची संपूर्ण प्रक्रिया पार पडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narnedra Modi) यांनी जनतेचे आभार मानण्यासाठी काही खास ट्वीट्स केले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी मानले जनतेचे आभार
शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर मोदी यांनी एक्स या समाजमाध्यमाद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या निवडणुकीत संपूर्ण भारताने मतदान केले आहे. ज्यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला त्या सर्वांचे मी आभार मानतो. मतदारांचा सक्रिय सहभाह हा आपल्या लोकशाहीसाठी फार महत्त्वाचा घटक आहे. मतदारांचे समर्पण आणि वचनबद्धता यामुळे आपल्या देशातील लोकशाहीची भावना सुनिश्चित होते. देशातील महिला तसेच तरुणांचे मी विशेष कौतुक करू इच्छितो. त्यांनी उत्स्फूर्तपणे मतदान केले, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
सुरक्षा संस्थांचेही मानले आभार
संपूर्ण निवडणूक सुरळीत आणि निष्पक्षपणे पार पडावी यासाठी देशातील सुरक्षा व्यवस्थेने खूप मेहनत घेतली. त्याबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. आपल्या सुरक्षा व्यवस्था संपूर्ण निवडणुकीदरम्यान दक्ष होत्या. त्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात सुरक्षित वातावरण निर्माण झाले. ज्यामुळे लोकांना मतदानाच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळाली. सुरक्षा व्यवस्थेतील सर्वांनी दिलेली सेवा ही कौतुकास पात्र आहे, असेदेखील मोदी म्हणाले.
एनडीए कार्यकर्त्यांसाठी विशेष ट्वीट
एनडीएच्या कार्यकर्त्यांनी आपला विकासाचा अजेंडा जनतेला समजावून सांगितला. तीव्र उष्णता असताना एनडीच्या कार्यकर्त्यांनी काम केले.त्या सर्वांचे मी कौतुक करतो. तीव्र उष्णता असताना मी एनडीएच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे कौतुक करू इच्छितो. आपले कार्यकर्ते हेच आपलं बळ आहे, अशा भावना मोदी यांनी व्यक्त केल्या.
मोदींची इंडिया आघाडीवर सडकून टीका
मोदी यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीवरही टीका केली. इंडिया आघाडीला लोकांना आकर्षित करता आले नाही. इंडिया आघाडी ही जातीवादी, भ्रष्ट आहे. घराणेशाहीला पोसण्यासाठी इंडिया आघाडी करण्यात आली. इंडिया आघाडी भविष्यातील दृष्टीकोन सांगण्यात अपयशी ठरले. इंडिया आघाडीने संपूर्ण प्रचारात मोदी यांना लक्ष्य केले. पण जनतेने त्यांच्या प्रतिगामी राजकारणाला नाकारले आहे, अशी टीका मोदी यांनी केली.
हेही वाचा :
Lok Sabha Election Exit Poll 2024 : भाजपचा 400 पारचा नारा खरा ठरणार? तीन एक्झिट पोल NDAच्या बाजूने