मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं. महाराष्ट्रासह देशभरातील 95 जागांसाठी हे मतदान घेण्यात आलं. देशभरात आज देशात 66.63 टक्के मतदान झालं. दुसऱ्या टप्प्यात माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा, केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह, द्रमुक नेते डी राजा, अभिनेत्री हेमा मालिनी आणि अभिनेते राज बब्बर हे निवडणुकीच्या मैदानात आपलं नशिब आजमावत आहेत.


दुसऱ्या टप्प्यात 13 राज्यातील 97 जागांवर मतदान होणार होतं, मात्र त्रिपुरातील पूर्व त्रिपुरा आणि तामिळनाडूच्या वेल्लोर या जागांवरील मतदान स्थगित करण्यात आलं आहे. त्यामुळे आज 12 राज्यातील 95 जागांवर मतदान पार पडलं.


तामिळनाडूमध्ये 39 पैकी 38 जागांवर, बिहारमध्ये 40 पैकी पाच जागांवर, जम्मू-काश्मीरमधील सहा पैकी दोन जागांवर, उत्तर प्रदेशमधील 80 पैकी आठ जागांवर, कर्नाटकमध्ये 28 पैकी 14 जागांवर, महाराष्ट्रात 48 पैकी 10 जागांवर आणि पश्चिम बंगालमधील 42 पैकी तीन जागांवर तर आसाम आणि ओदिशामध्ये पाच जागांवर आज मतदान झालं.


VIP उमेदवार


माजी पंतप्रधान देवेगौडा कर्नाटकच्या टुमकुरमधून, नांदेडमधून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, द्रमुक नेते दयानिदी मारन, तमिळनाडूच्या नीलगिरीसमधून ए राजा, तमिळनाडूच्या तुत्थूकुडीमधून कनिमोई, उत्तर प्रदेशच्या फतेहपूर सिकरीमधून अभिनेते आणि उत्तर प्रदेशचे काँग्रेस अध्यक्ष राज बब्बर, उत्तर प्रदेशच्या मथुरामधून अभिनेत्री हेमा मालिनी, जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमधून नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला इत्यादी नेते दुसऱ्या टप्प्यात आपलं नशीब आजमावत आहेत.