मोदींनी राजीव गांधींच्या नावावर निवडणूक लढवण्याचं आव्हान काँग्रेसला दिलं. दिल्लीत शीख मतदारांची संख्या लक्षणीय आहे, त्यामुळे 1984 च्या शीख दंगलींची जखम ताजी करण्याचा प्रयत्न भाजपने केला. भरीस भर म्हणून काँग्रेसच्याच सॅम पित्रोदांनी आपल्या वाचाळतेचा नमुना दाखवत भाजपला आयती संधी मिळवून दिली.
आपल्या वाणीने शत्रुपक्षाला मदत करण्याची, आपल्याच गोटात खळबळ उडवून देण्याची, सेल्फ गोल करण्याची ही परंपरा आजवर मणिशंकर अय्यर, दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांकडे होते. पण मणिशंकर शांत झाले, तर यावेळी सॅम पित्रोदा यांनी त्यांची कसर भरुन काढली. शेवटी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना याची दखल घ्यावी लागली. सॅम पित्रोदांनी निवडणूक होईपर्यंत कुठलंही राजकीय विधान करु नये, केवळ आंतरराष्ट्रीय विषयांवरच बोलावं असा आदेश त्यांना काढावा लागला. सॅम पित्रोदा हे केवळ नेते नाहीत, तर ते राहुल गांधींचे राजकीय गुरुही मानले जातात. आता त्यांनाच अशा पद्धतीने समज देण्याची वेळ राहुल गांधींवर आली.
दिल्लीतल्या या प्रचारात आम आदमी पक्षाकडून आणि भाजपमधल्या युद्धानेही टोक गाठलं. पूर्व दिल्लीत भाजपकडून गौतम गंभीर आणि आपकडून आतिषी मर्लेना सिंह अशी लढत होत आहे. या मतदारसंघात आतिषी यांच्याविरोधात अतिशय अश्लील भाषेत चिखलफेक करणारी पत्रकं वाटण्यात आली. पत्रकार परिषदेत याची माहिती देताना आतिषी यांना रडू आवरलं नाही. तर आपल्यावरचे हे आरोप सिद्ध झाले तर आपण उमेदवारी मागे घेऊ अशी गर्जना भाजप उमेदवार गौतम गंभीर याने केली.
दिल्ली, पंजाबमधलं मतदान जवळ येत असतानाच पंतप्रधान मोदींनी राजीव गांधींना प्रचारात ओढलं, हिंमत असेल तर पुढचे दोन टप्पे राजीव गांधींच्या नावावर लढवून दाखवा, असं आव्हान दिलं. मोदींच्या या आव्हानाला प्रत्युत्तर दिलं काँग्रेसकडून प्रियंका गांधी यांनी. त्या म्हणाल्या की, एक दिल्लीची मुलगी तुम्हाला खुलं आव्हान देते की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या दोन टप्प्यात नरेंद्र मोदींनी नोटबंदी, जीएसटी, महिला सुरक्षा यावर बोलावं. तसेच जी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेत आला होतात, त्या मुद्द्यावर सविस्तर बोलून प्रचार करावा. देशातील तरुणांना खोटी आश्वासनं देऊन तुम्ही सत्तेत आलात, त्या आश्वासनांवर बोलावं.
सेलिब्रेटींना निवडणुकीत उतरायची हौस तर खूप असते, पण प्रत्यक्ष राजकारण किती अवघड असतं याची झलक दिल्लीतल्या प्रचारात पाहायला मिळाली. कारण क्रिकेटपटू गौतम गंभीर यानं प्रचारात उन्हापासून वाचण्यासाठी चक्क डुप्लिकेटचा वापर केला. उमेदवार स्वत: गाडीत बसून एसीची हवा खात होते आणि डुप्लिकेट रणरणत्या उन्हात लोकांना अभिवादन करण्याची जबाबदारी पार पडत होता.
दिल्लीतल्या प्रचारात पुन्हा एकदा थप्पड की गूंजही ऐकायला मिळाली. आपच्या उमेदवारासाठी रोड शो करत असताना अरविंद केजरीवाल यांना एका तरुणाने अचानक थप्पड लगावली. या प्रकरणावरुनही भाजप-आपमध्ये जोरदार जुंपली. हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप केजरीवाल यांनी केला, तर प्रसिद्धीसाठी केजरीवाल यांनीच हा बनाव रचल्याचा आरोप भाजपनं केला.
दिल्लीतल्या सातपैकी सात जागा मागच्या वेळी भाजपने जिंकलेल्या होत्या. यावेळी भाजपला हरवण्यासाठी आप आणि काँग्रेस एकत्र येणार का अशी चर्चा शेवटपर्यंत सुरु होती. पण ही युती काही झालीच नाही. त्यामुळे आता सातही जागांवर तिरंगी लढत होत आहे.
- उत्तर पूर्व दिल्लीत काँग्रेसच्या शीला दीक्षित विरुद्ध भाजपचे मनोज तिवारी अशी लढत आहे
- नवी दिल्ली मतदारसंघात काँग्रेसचे अजय माकन विरुद्ध भाजपच्या मिनाक्षी लेखी अशी लढत आहे
- पूर्व दिल्लीत आपच्या आतिषी मर्लेना सिंह आणि भाजपकडून गौतम गंभीर अशी जोरदार टक्कर पाहायला मिळतेय
- चांदणी चौक मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन विरुद्ध आपचे पंकज गुप्ता आणि काँग्रेसकडून जयप्रकाश अग्रवाल अशी लढत आहे.
दिल्लीतल्या या लढतीत सेलिब्रिटींची काही कमी नाही. भाजपने वायव्य दिल्लीत पंजाबी गायक हंसराज हंस यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने बॉक्सर विजेंदर सिंह याला दक्षिणी दिल्लीतून उमेदवारी दिली आहे.
दिल्ली, हरियाणासह पंजाबमधल्याही काही जागांसाठी उद्या मतदान पार पडतंय. प्रचारात शीख दंगलीची जखम पुन्हा ओली करण्याचा जो प्रयत्न झाला, त्याचा नेमका कसा परिणाम होतो, खरंच भाजपला त्याचा फायदा होईल काय याचं उत्तर आपल्याला 23 तारखेलाच कळेल.