Maharashtra Vidhansabha Elections 2024 solapur : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठीची (Maharashtra Vidhansabha Election) 288 मतदारसंघातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या सर्व जागांचे निकाल 23 नोव्हेंबरला लागणार आहेत. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी हालचालींना सुरुवात केली आहे. महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरु केले आहे. ज्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजयी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणच्या उमेदवारांना महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी फोन केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा आणि सांगोला मतदारसंघातील अपक्ष उमेदवारांना दोन्ही बाजूकडून निरोप यायला सुरुवात झाल्याची माहिती मिळत आहे. 


संभाव्य विजयी उमेदवारांवर महाविकास आघाडी आणि महायुतीचं विशेष लक्ष


यावेळी माढा विधानसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा झाली. या मतदारसंघातून माढ्याचे सलग सहा वेळा आमदार राहिलेले आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती.  रणजित शिंदे यांच्याकडे संभाव्य विजयी उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. याच पद्धतीने रणजित शिंदे यांचे चुलते आणि करमाळा विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आमदार संजय मामा शिंदे यांच्यावर देखील दोन्ही बाजूचे लक्ष आहे. ते देखील विजयी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचबरोबर सांगोल्यातून शेकापकडून निवडणूक लढवीत असलेले डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याकडे देखील संभाव्य विजयी उमेदवार म्हणून बघितले जात आहे. सध्या या सर्वच अपक्ष उमेदवारांना पक्षांचे निरोप यायला सुरुवात झाल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही ठिकाणच्या नेत्यांचे फोन आल्याची माहिती यातील एका उमेदवाराने सांगितली आहे. दोन्हीकडील नेत्यांनी आपल्याचसोबत राहण्याचा आग्रह केला जात असल्याची माहिती उमेदवाराने दिली आहे. 


दरम्यान, सांगोल्याचे अपक्ष शेकापचे उमेदवार बाबासाहेब देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांचे फोन आले आहेत. मात्र, 23 तारखेनंतर जनतेला आणि आमचा पक्ष जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल अशी माहिती बाबासाहेब देशमुख यांनी दिली. मला पूर्ण विजयाची खात्री असल्याचे देशमुख म्हणाले. 


एक्झिट पोलनंतर हालचालींना वेग


विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्स समोर आले आहेत. यामध्ये महायुतीच्या जागा जास्त येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एक्झिट पोलनुसार,महायुतीला 150 पर्यंत जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.    तक महाविकास आघाडीला देखील एक्झिट पोलमध्ये 110 ते 120 च्या दरम्यान जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळं दोन्हीकडी नेत्यांनी अपक्ष उमेदवारांना गळाला लावण्याचे प्रयत्न निकालाआधीच सुरु केले आहेत.  मात्र, खरं चित्र हे येत्या 23 नोव्हेंबरला स्पष्ट होणार आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण विजयी होणार हे समजणार आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Maharashtra Vidhan Sabha Election Result: एक्झिट पोलचे निकाल समोर येताच मविआच्या हालचाली सुरु, जयंत पाटील-बाळासाहेब थोरातांकडून अपक्ष, बंडखोर आमदारांशी संपर्क