विधानसभा निवडणुकीसाठी 21 ऑक्टोबरला मतदान पार पडलं. त्यानंतर आज या निवडणुकांचा निकाल आज लागला आहे. निकालापूर्वीचा जल्लोष, विजयानंतरचं सेलिब्रेशन तर आपण पाहत आहोतच पण मतदानाच्या दिवशी एक अनोखा प्रकार घडला, काही उमेदवारांनी मतदान झाल्यानंतरच विजय साजरा केला. सर्व उमेदवार निकालाच्या प्रतीक्षेत असताना काही ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडताच मिरवणूक, बॅनर्स लावले होते.
गंमत अशी की निकाल लागण्याअगोदर विजयाचा विश्वास असलेल्या या उमेदवारांपैकी भाजपचे चंद्रकांत पाटील, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि हसन मुश्रीफ हे तिघंच निवडून आले, दापोलीचे संजय कदम आणि खडकवासलाचे सचिन दोडकेंचा पराभव झाला आहे.
रत्नागिरीतील दापोलीत राष्ट्रवादीच्या संजय कदम यांनीही निकालापूर्वीच विजयी मिरवणूक काढली होती. विशेष बाब म्हणजे संजय कदमांनी आतापर्यंत लढलेल्या सर्वच निवडणुकांमध्ये निकालापूर्वीच विजय साजरा केला आहे. संजय कदम यांच्याविरुद्ध शिवसेनेचे नेते रामदास कदम यांचा मुलगा योगेश कदम यांचं तगडं आव्हान होतं आणि योगेश कदम यांचा विजयही झाला.
पुण्यातील खडकवासला येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सचिन दोडके यांचे मतदान झाल्यानंतर वारजे भागात आमदार झाल्याबद्दल शुभेच्छा देणारे बॅनर्स लावण्यात आले. एवढंच नाही तर दोडकेंच्या समर्थकांनी त्यांना खांद्यावर घेऊन मिरवणूकही काढली आणि फटाक्यांची आतषबाजी देखील केली. कोल्हापुरात राष्ट्रवादीचे उमेदवार हसन मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनीदेखील मतदानाच्या दिवशीच विजयी मिरवणूक काढली. मात्र या सर्व उमेदवारांचा हा कॉन्फिडन्स नाही तर ओव्हर कॉन्फिडन्स होता हे आज पराभवानंतर सिद्ध झालं आहे.