Krishnaraaj Mahadik: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवार कृष्णराज महाडिक यांनी दुसऱ्याच दिवशी माघार घेतली आहे. महापालिकेची निवडणूक कार्यकर्त्यांची असल्यामुळे खासदार धनंजय महाडिक यांनी हा निर्णय घेतला आहे. काल अर्ज दाखल केल्यानंतर कुटुंबीयांचा आशीर्वाद आणि मित्रांच्या सहकार्याने आपण निवडणुकीच्या मैदानात उतरलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. भाजपकडून अजून कोल्हापुरात उमेदवारी निश्चिती झाली नसतानाही कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
काय म्हणाले कृष्णराज महाडिक?
भारतीय जनता पक्ष ही अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे. पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून, या पक्षातील कार्यकर्ते काम करत असतात. त्यानुसार पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयाचा आदर राखत, मी कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक लढवणार नाही, असे जाहीर करत आहे. महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढवणार आहे. अशावेळी इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यापैकी आणि कोणालाही निवडणूक लढवण्याची संधी मिळावी, या विचारातून मी महापालिका निवडणूक लढवणार नाही. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार, मी निवडणूक लढवण्याचे घोषित केले होते. आता पक्षीय पातळीवर झालेल्या निर्णयानुसार मी निवडणूक लढवणार नाही. तथापि या निवडणुकीसाठी पक्षीय पातळीवर माझ्या नावाचा विचार झाला, ही सुद्धा माझ्यासाठी जमेची आणि समाधानाची बाब आहे. यापुढेही समाजकारणात मी नेहमीच कार्यरत राहीन. माझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि पाठबळ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचा, कुटुंबातील सदस्यांचा मी ऋणी आहे.
खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम
दरम्यान, काल (28 डिसेंबर) बोलताना ही निवडणूक आपण पूर्णपणे स्वतःच्या ताकदीवर लढवत असल्याचं सांगताना, खासदार धनंजय महाडिक यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन कायम असल्याचं त्यांनी नमूद केलं. सध्या खासदार धनंजय महाडिक यांच्यावर अनेक जिल्ह्यांची जबाबदारी असल्याने ते किती वेळ देऊ शकतील हे माहित नसले, तरी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या साथीनं आपण ही निवडणूक समर्थपणे लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृष्णराज महाडिक म्हणाले की, सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजातील विविध प्रश्नांवर सक्रियपणे काम केल्याचा अनुभव आहे. नागरिकांकडून मिळणारा विश्वास हीच आपली मोठी ताकद असल्याचं महाडिक यांनी नमूद केलं. सर्वांच्या आशीर्वादाने आणि पाठबळावरच ही निवडणूक लढवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च
ते म्हणाले की, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका आणि लोकप्रतिनिधी यांच्यात योग्य समन्वय आवश्यक आहे. टाऊन प्लॅनिंगच्या माध्यमातून नियोजनबद्ध विकास करण्याचा मानस आहे. कोल्हापुरात मागील अनेक वर्षांत विकासकामं झाली असली तरी त्यांची देखभाल न झाल्याने वारंवार एकाच कामासाठी निधी खर्च केला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधलं. ही प्रक्रिया थांबवून शाश्वत विकासावर भर देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खेळांमुळे शिस्त, नेतृत्व आणि जीवनमूल्ये घडतात, जी केवळ पुस्तकातून शिकता येत नाहीत, असं ते म्हणाले. विरोधकांवर टीका करण्याऐवजी विकासकामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचं सांगत, विरोधकांकडून होणाऱ्या आरोप-प्रत्यारोपांकडे आपण दुर्लक्ष करणार असल्याची भूमिका महाडिक यांनी स्पष्ट केली. अन्य 80 उमेदवारांसाठी विरोधकांची टीका सहन करण्यास आपण तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं.