पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून निवडणूक अर्ज भरला आहे. पुण्याबाहेरील असल्यामुळे त्यांच्याशी संपर्क कसा साधणार, पुण्यात त्यांचं घर नाही, ते राहणार कुठे, असे प्रश्न उपस्थित राहिले होते. परंतु हा प्रश्न आता संपुष्टात आला आहे. कारण चंद्रकांत पाटील त्यांनी कोथरुड परिसरातच भाड्याने घर घेतलं आहे.

देशातील सध्याचा सर्वात मोठ्या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाने भाड्याने घर घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. पैसे नसल्यामुळे स्वतःचे घर घेता आलं नाही. परंतु भविष्यात नक्कीच घर घेऊ, असंही चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सध्या मी कोथरुड परिसरातीलच कुंबरे टाऊनशिप इथे एका मित्राच्या घरात राहत असल्याचं पाटील म्हणाले

दरम्यान, कोथरुडमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मनसेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आघाडीच्या नेत्यांनी मनसेला पाठिंबा आहे का? हे स्पष्ट करावे अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटलांविरोधात नाराजी
कोथरुड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यापासूनच चंद्रकांत पाटील यांना नाराजी आणि बंडखोरीचा सामना करावा लागत आहे. कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण मतदारांची संख्या निर्णायक आहे. 'दूरचा नको, घरचा उमेदवार हवा' अशी पोस्टरबाजी करुन पाटील यांना विरोध दर्शवण्यात आला होता. मात्र, प्रत्यक्षात कोथरुडचं प्रतिनिधित्व करण्याची संधी ब्राह्मण व्यक्तीला मिळावी, हाच यामागचा उद्देश होता.

मेधा कुलकर्णी या मागील पाच वर्षांपासून कोथरुडचं प्रतिनिधित्त्व करत होत्या. परंतु या मतदारसंघातून पाटील यांचं नाव जाहीर होताच नाराजी उफाळून आली. मेधा कुलकर्णी यांची नाराजी भाजपने दूर केली, पण इथल्या ब्राह्मण संघटनांनी बंडाचा झेंडा फडकावला होता. परशुराम सेवा संघाच्या सत्यजीत देशपांडे यांनी पाटलांविरोधात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु आज त्यांनी माघार घेतली. तर ब्राह्मण महासंघानेही पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.