Kolhapur Municipal Corporation: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने पहिली 48 जणांची यादी जाहीर केल्यानंतर आता दुसऱ्या यादीमध्ये 14 जणांना संधी दिली आहे. या यादीमध्ये बहुतांश माजी नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. दरम्यान, महायुतीमध्ये अजूनही जागा वाटपावरून रस्सीखेच सुरूच आहे. आज (29 डिसेंबर) सकाळी जागावाटप जाहीर होईल असं म्हटलं जात होतं. मात्र अजूनही नेत्यांकडून चार जागांवर मतभेद असल्याने काथ्याकुट सुरूच आहे. जिल्हा बँकेच्या मुख्यालयात अजूनही खल सुरुच आहे. त्यामुळे कोल्हापूरमधील जागावाटपाचा महायुतीमधील पेच कायम असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट कोल्हापूर महापालिकेसाठी एकत्रित निवडणूक लढवतील. 

Continues below advertisement

ठाकरे गटासाठी अखेर 7 जागांवर एकमत

शिवसेना ठाकरे गटासाठी अखेर 7 जागांवर एकमत करण्यात आलं असून उर्वरित जागांवर काँग्रेसचे उमेदवार असतील. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेला काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार असणार आहेत. आतापर्यंत काँग्रेसकडून 62 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. यामध्ये एक मनसेचा उमेदवार आहे. राजू दिंडोर्ले यांना काँग्रेसकडून पुरस्कृत करण्यात आलं आहे. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप हाच मोठा भाऊ राहण्याची चिन्हे आहेत. जवळपास 34- 32-15 असा फॉर्मुला आकारास येत असल्याची चर्चा आहे. मात्र, अजूनही चार जागांवर एकमत होत नसल्याने जागावाटप जाहीर करण्यात आलेलं नाही.

काँग्रेस उमेदवारांचा अर्ज दाखल 

दरम्यान, कोल्हापुरात प्रभाग क्रमांक पाचमधील काँग्रेसच्या उमेदवारांनी आपला अर्ज दाखल केला आहे. मोठं शक्तीप्रदर्शन करत काँग्रेसच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रभाग क्रमांक 5 हा सतेज पाटील यांचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करताना काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुसरीकडे कोल्हापूरमध्ये तिसऱ्या आघाडी सुद्धा आकारास आली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि आपने एकत्रित मिळून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि वंचितकडून आपकडून काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, अजूनही महायुतीमधील एकाही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही. 

Continues below advertisement

दुसरीकडे भाजपकडून खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या उमेदवारीला भाजप आणि शिवसेनेमधून सुद्धा कडाडून विरोध झाल्याने अखेर त्यांनी अर्ज माघार घेण्याची घोषणा काल केली. दरम्यान आज आणि उद्या हे दोनच दिवस उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी असल्याने आज दुपारपर्यंत तरी महायुतीचे उमेदवार निश्चित होणार का? याकडे लक्ष असेल.  

इतर महत्वाच्या बातम्या