कोल्हापूर : कोल्हापूरच्या महापौर-उपमहापौरपदासाठी आज निवडणूक होणार आहे. खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद आरक्षित आहे. महापौरपदासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सरिता मोरे, तर उपमहापौरपदासाठी भूपाल शेटे रिंगणात आहेत. भाजप-ताराराणी आघाडीकडून महापौरपदासाठी जयश्री जाधव, तर उपमहापौरपदासाठी कमलाकर भोपळे निवडणूक लढवत आहेत.


भाजपनेही निवडणुकीत तुल्यबळ उमेदवार उतरवल्याने कोणत्याही क्षणी काहीही होईल, या शक्यतेने काँग्रेस-राष्ट्रवादीपुढे धोका निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे दोन नगरसेवक पक्षांतर बंदीच्या कायद्यांतर्गत अपात्र झाले आहेत. जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत न दिल्याने पाच नगरसेवक अपात्र ठरत आहेत. महापौर निवडणुकीपूर्वी त्यांचे आदेश महापालिकेत धडकण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे चार नगरसेवक मतदान करण्याऐवजी तटस्थ राहणार आहेत. परिणामी, निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

महापालिका प्रशासनाच्या वतीने निवडणुकीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या स्थायी समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांनी भाजपला मतदान केले होते. राष्ट्रवादीने त्यांच्याविरुद्ध पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाईसाठी तक्रार केली होती. तब्बल दहा महिन्यांनंतर महापौर निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवरच नगरसेवक अफजल पिरजादे आणि अजिंक्य चव्हाण यांना नेमकं अपात्र ठरवण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांना महापौर निवडणुकीत मतदान करता येणार नाही.

जात पडताळणी प्रमाणपत्र वेळेत दाखल न केल्याने महापालिकेतील पाच नगरसेवकांवर टांगती तलवार आहे. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या चार आणि भाजपच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे. या नगरसेवकांवर गंडांतर आणून काँग्रेस-राष्ट्रवादीला खिंडीत पकडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. त्यानुसार मंत्रालयात कार्यवाहीही सुरु आहे. महापौर, उपमहापौर निवडणुकीसाठी आज मतदान होत असून सकाळी दहा वाजता संबंधित पाच नगरसेवकांची पदे रद्द केल्याचा आदेश महापालिकेत धडकण्याची दाट शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या दोन नगरसेवकांची पदे रद्द झाल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे संख्याबळ 42 झाले आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल केले नसल्याने कारवाई झाल्यास आणखी चार नगरसेवकांचे पद रद्द होणार आहे. त्यामुळे संख्याबळ 38 वर येईल. याच कारणास्तव भाजपच्या एका नगरसेवकाचे पद रद्द झाल्यास भाजप-ताराराणी आघाडीचे नगरसेवक 32 होतील. जर जात पडताळणी प्रमाणपत्रावरुन नगरसेवकांवर कारवाई झालीच नाही, तर मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीचा विजय निश्‍चित होण्याची शक्यता आहे. कारण सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात तब्बल नऊ नगरसेवकांचा फरक असेल.

मतांचे गणित

काँग्रेस-राष्ट्रवादी - 44, दोन अपात्र - 42, चार अपात्र ठरल्यास  - 38

भाजप-ताराराणी - 33, एक अपात्र ठरल्यास - 32

शिवसेना - 4 तटस्थ राहणार

जिंकण्यासाठी भाजप-ताराराणी आघाडीला चार मते पाहिजेत.

तसे झाल्यास...

काँग्रेस-राष्ट्रवादी होईल     - 34

भाजप-ताराराणी होईल     - 36

त्यामुळे आजच्या महापौर निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे.