Gokul Dudh Sangh Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्याचे राजकारण आणि 'गोकुळ' दूध संघ (Gokul) यांचं एक वेगळंच समीकरण आहे. गोकुळच्या निमित्ताने कोल्हापुरात पुन्हा एकदा पारंपरिक राजकीय विरोधक असलेले आमदार सतेज पाटील आणि खासदार धनंजय महाडिक आमनेसामने आले आहेत. गोकुळ दूध संघात मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपावरून या दोन्ही नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्याचे राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं चित्र आहे.

Continues below advertisement

Satej Patil Statement : जिल्ह्यातील नेते कमकुवत, सतेज पाटलांचा टोला

काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि महाडिक गटावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, "यापूर्वी कधीही सहकारी संस्थांच्या स्थानिक कारभारात वरिष्ठ किंवा राज्य पातळीवरील नेत्यांचा हस्तक्षेप नसायचा. राज्यात काँग्रेसची सत्ता असताना एकाही मुख्यमंत्र्यांनी गोकुळच्या कारभारात कधी ढवळाढवळ केली नाही. मात्र, आता गोकुळ दूध संघामध्ये थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष घालावं लागत आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की जिल्ह्यातील सत्ताधारी नेते अत्यंत कमकुवत झाले आहेत."

आगामी काळात सर्व समविचारी पक्ष गोकुळ वाचवण्यासाठी आम्हाला पूर्ण साथ देतील, असा विश्वासही सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Continues below advertisement

Dhananjay Mahadik Retaliation : सतेज पाटलांचा 25-0 ने पराभव करणार, महाडिकांचा निर्धार

सतेज पाटील यांच्या या टीकेला भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं. महाडिक म्हणाले की, "सहकारी संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेपाची सुरुवात महाविकास आघाडीच्या (MVA) काळातच झाली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि सतेज पाटील मंत्री असताना त्यांनी स्थानिक नेत्यांवर दबाव टाकून गेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे पॅनेल तयार केलं होतं. आगामी काळात राजाराम कारखाना, कोल्हापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद या निवडणुकांप्रमाणेच गोकुळ दूध संघातही सतेज पाटील यांचा 25-0 असा धुव्वा उडवून त्यांचा दारूण पराभव करू."

427 Milk Societies Disqualified : 427 दूध संस्था नव्याने अपात्र

गोकुळ दूध संघाच्या विद्यमान संचालक मंडळाला मुदतवाढ नाकारण्यात आल्यानंतर सध्या तिथे प्रशासकीय राजवट सुरू आहे. प्रशासकाकडून तब्बल 427 दूध संस्थांना अपात्र (Disqualified) ठरविण्यात आल्यानं गोकुळच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. संबंधित संस्थांची निवडणूक प्रक्रिया वेळेत न होणे, दूध संकलन अत्यंत कमी असणे, अशा विविध तांत्रिक कारणास्तव ही अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, या कारवाईमध्ये पूर्वीपासून अवसायानात (Liquidation) काढण्यात आलेल्या 1.320 दूध संस्थांचा समावेश नाही. त्यामुळे या जुन्या संस्थांचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असतानाच, आता नव्याने 427 संस्था अपात्र ठरल्या आहेत. सध्या या संस्थांची प्रशासनाकडून सखोल पडताळणी सुरू आहे.

Gokul Election Impact : अपात्र संस्थांचा मुद्दा निवडणुकीत कळीचा ठरणार

गोकुळ दूध संघाची निवडणूक अत्यंत जवळ आली असून, अशा ऐन निवडणुकीच्या तोंडावर एकाच वेळी 427 दूध संस्था अपात्र ठरल्यामुळे मतदार यादीवर आणि मतदानावर याचा मोठा परिणाम होणार आहे. त्यामुळे आगामी काळात हा अपात्र संस्थांचा मुद्दा दोन्ही गटांसाठी कोर्टात आणि राजकीय मैदानात कळीचा ठरण्याची चिन्हे आहेत.

ही बातमी वाचा: