चंद्रपूर : केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी 29 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळं राजकीय नेत्यांसाठी पुढील काही दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांच्या नेतृत्त्वावर विश्वास ठेवत अनेक नेते प्रवेश करत आहेत. समरजीतसिंह घाटगे, हर्षवर्धन पाटील, संजीवराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण यांनी गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे. आता चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार देखील शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करुन तुतारीवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा आहेत.
कोण आहेत किशोर जोरगेवार?
चंद्रपूर हा विधानसभा मतदारसंघ अनूसुचित जमाती प्रवर्गासाठी राखीव आहे. किशोर जोरगेवार हे 2019 मध्ये भाजप उमेदवाराचा पराभव करत विजयी झाले होते. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार असताना किशोर जोरगेवार यांनी ठाकरेंना पाठिंबा दिला होता. जून 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांचं सरकार स्थापन होत असताना किशोर जोरगेवार यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. 2019 ला किशोर जोरगेवार यांनी भाजप उमेदवाराला पराभूत केलं होतं. यावेळी महायुतीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाकडे जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. याचदरम्यान किशोर जोरगेवार यांची नवी भूमिका समोर आली आहे.
तर तुतारीवर लढण्यास तयार?
महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. महाविकास आघाडीच्या जागा वाटपात चंद्रपूर हा मतदारसंघ कोणत्या पक्षाला जातो यावर किशोर जोरगेवार यांची पुढील राजकीय दिशा ठरणार आहे. जर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला चंद्रपूरची जागा मिळाली तर या ठिकाणावरुन तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे संकेत किशोर जोरगेवार यांनी दिले आहेत. त्यामुळं आणखी एक आमदार मविआकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम:
निवडणुकीचं नोटिफिकेशन: 22 ऑक्टोबर 2024अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख: 29 ऑक्टोबर
अर्जांची तपासणी : 30 ऑक्टोबर 2024अर्ज मागं घेण्याची तारीख : 4 नोव्हेंबर
मतदान :20 नोव्हेंबर 2024मतमोजणी : 23 नोव्हेंबर 2024निवडणूक प्रक्रिया समाप्त: 25 नोव्हेंबर 2024
इतर बातम्या :