बंगळुरू: कर्नाटकमध्ये झालेल्या राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजपचे तीन तर काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या वतीनं केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण या निवडणूक लढवत होत्या, त्यांना पहिल्या पसंतीची 46 मतं मिळाली. तर काँग्रेसचे जयराम रमेशही निवडून आले आहेत. 


कर्नाटकात क्रॉस व्होटिंग
कर्नाटकात आज राज्यसभेच्या चार जागासाठी मतदान झालं. पण, चर्चा झाली ती धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एका आमदाराची. के श्रीनिवास गौडा या जेडीएसच्या आमदारनं थेट काँग्रेसला मत दिलं. त्यामुळे त्यांचं मत बाद झालं. पण तिथंही निकाल लांबला. कर्नाटकात चौथ्या जागेसाठी काँग्रेस, भाजप आणि जेडीएसमध्ये लढत झाली. पण क्रॉस वोटिंगमुळे संयुक्त जनता दलाचं नुकसान झालं आणि त्यांना ही जागा गमवावी लागली.


कर्नाटकातील विजयी उमेदवार



  • निर्मला सीतारमण - भाजप 46 मतं

  • जग्गेश- भाजप 46 मतं

  • लहर सिंह सिरोया- भाजप 33 मतं

  • जयराम रमेश- काँग्रेस 46 मतं


राजस्थानमध्ये काँग्रेसची बाजी
राजस्थानमध्ये आज झालेल्या राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसने 4 पैकी 3 जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला आहे. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर भाजपला केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे. राज्यसभा निवडणुकीत भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. भाजप समर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. 



राज्यातला निकाल रखडला


महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज मतदान झाले. मतदानानंतर सांयकाळी सहाच्या दरम्यान निकाल लागणे अपेक्षित होते. परंतु महाविकास आघाडीची तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती. त्यानंतर अपक्ष आमदार रवी राणा आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतांवर काँग्रेसने आक्षेत घेतला. या संपूर्ण गोंधळात पाच तासांपासून निकाल रखडला आहे.