बेळगाव: कर्नाटकच्या निवडणुका (Karnataka Election 2023) जसजशा जवळ येत आहेत तसतसे राजकीय वातावरण तापत आहे, एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. मतदारांने आपल्यालाच मतदान करावं यासाठी प्रत्येक पक्षाकडून कंबर कसली जात आहे, त्यासाठी जे काही करावं लागतं, ते सर्व राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. त्यातच मतदारांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे अवलंबले जात आहेत. असाच एक फंडा सौंदत्तीमध्ये एका उमेदवाराच्या अंगलट आला आल्याचं दिसून आलं. बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती तालुक्यातील तेग्गीहाळ गावात शेतातील शेडमध्ये  मतदारांना वाटण्यासाठी अवैधरीत्या साठवून ठेवण्यात आलेले 1600 कुकर पोलिसांनी जप्त केले आहेत.


रामदुर्ग आणि सौंदत्ती तालुक्याच्या सीमेवर असणाऱ्या तेग्गीहाळ गावात शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये कुकर अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस पथक आणि एफ एस टी पथकाने शेतातील शेडवर धाड टाकून अवैधरीत्या साठा करून ठेवण्यात आलेले सोळाशे कुकर जप्त करण्यात आले. 


सौंदत्ती पोलीस आणि एफ एस टी पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी सौंदत्ती पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे कुकर कोणी आणून ठेवले होते याची माहिती अद्याप मिळालेली नाही. निवडणूक जवळ येत असल्याने अनेक उमेदवार मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी विविध भेटवस्तू देण्यात येत आहेत. त्यातलाच हा प्रकार असल्याचं सांगण्यात येतंय. पोलिस पुढील तपास करत आहेत.


Karnataka Election 2023 : सीमावर्ती भागात 1.54 कोटींची बेहिशोबी रक्कम जप्त


कर्नाटकमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. रामदुर्ग पोलिसांनी बेहिशोबी एक कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती आहे. ही रक्कम निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी या रक्कमेची माहिती आयकर विभागाला दिली आहे. 


कर्नाटकात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने सीमावर्ती भागात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. यातच एका कारमधून कोट्यवधी रक्कम नेण्यात येणार असल्याची माहिती पोलिासांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी कारवाई केली आणि संबंधित कार ताब्यात घेतली. या कारमध्ये एक कोटी 54 लाख रुपये बेहिशोबी सापडल्याची माहिती आहे. या कारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.


ही बातमी वाचा: