बेळगाव: कर्नाटकात राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवणार असून पक्षाने नऊ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून उत्तम पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे घड्याळ या चिन्हावर कर्नाटकमधील निवडणूक पक्षाला लढता यावी यासाठी निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी पुन्हा आता घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढणार असून कर्नाटकात पहिल्या यादीत नऊ उमेदवारांची घोषणा केली आहे.
Belgaum Nipani Uttam Patil: निपाणीतून उत्तम पाटील यांना उमेदवारी
बेळगाव जिल्ह्यातील निपाणी मतदारसंघातून राष्ट्रवादीने आपला पहिला उमेदवार जाहीर केला असून उत्तम पाटील यांना उमेदवारी दिली आहे. उत्तम पाटील हे काँग्रेसमधून इच्छुक होते. पण काँग्रेसने त्या ठिकाणी काका पाटील यांना उमेदवारी दिली. त्यानंतर आता उत्तम पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. भाजपने या मतदारसंघातून शशिकला ज्वोल्ले यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तम पाटील हे उद्योजक आणि साखर कारखानदार आहेत. तसेच अरिहंत पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांचा या मतदारसंघात मोठा संपक्र आहे. तसेच उत्तम पाटील फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी युवक आणि महिलांसाठी काम केलं आहे. यामुळे उत्तम पाटील यांचे राजकीय नेटवर्क बळकट असल्याचं सांगितलं जातंय.
NCP Hasan Mushrif : मुश्रीफ पॅटर्न प्रभावी
निपाणी मतदारसंघात, खासकरून निपाणी शहरात कागलचे राष्ट्रवादीचे आमदार आणि राज्याचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांचा प्रभाव आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांचा या भागात जनसंपर्क आहे. त्यामुळे या मतदारसंघात राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याचं सांगितलं जातंय.
कोल्हापूरचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ हे दर निवडणुकीवेळी निपाणीत तळ ठोकतात. या आधी त्यांनी काँग्रेसचे उमेदवार काका पाटील यांना मदत केली होती. आता ते राष्ट्रवादीच्या मागे आपली ताकद लावतील हे स्पष्ट आहे.
या मतदारसंघावर आधीपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची नजर असल्याची चर्चा आहे. शरद पवार यांचे या मतदारसंघातील काका पाटील, प्रकाश हुक्किरे आणि इतर काँग्रेस नेत्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहे. आता उत्तम पाटील यांच्यासाठी शरद पवार या मतदारसंघात सभा घेणार आहेत.
कर्नाटकातील राष्ट्रवादीचे पहिल्या यादीतील नऊ उमेदवार
- निपाणी - उत्तम पाटील
- हिप्परगी - मन्सुर साहेब बिलगी
- बसवान बागेवाडी - जमिर अहमद इनामदार
- नाग्थन - कलाप्पा चव्हाण
- येलबर्गा - हरी आर
- रानेबेन्नूर - आर शंकर
- हग्री बोम्मनहल्ली - सुगुना के
- विरापेट - मन्सुद फौजदार
- नरसिम्हाराजा - श्रीमती रेहाना बानो
ही बातमी वाचा: