Karnataka Election Results 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election 2023) निकाल काल (13 मे) जाहीर झाला. या निकालात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं. 135 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray Group) तीन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही उमेदवारांना आपलं डिपॉझिट (Deposit) राखता आलं नाही. 


तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त


उद्धव ठाकरे गटाने रोण, विजापूर आणि खानापूर मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. या तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. त्यापैकी दोन उमेदवारांना 200 मतंही मिळवता आली नाहीत. विजापूर शहर मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सतीश पाटील यांना अवघे 149 मते मिळाली. दक्षिण कर्नाटकतल्या गदग जिल्ह्यातील रोण या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कुमार अंदप्पा हकारी यांना 122 मते मिळाती. 
तर सर्वाधिक 983 मते  बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघामधील कृष्णाजी पाटील यांना मिळाली. 


'या' मतदारसंघात कोणाचा विजय?


रोण मतदारसंघात काँग्रेसचे गुरुप्पादा गौडा सुगना गौडा पाटील हे 94865 मते मिळवत विजयी झाले. तर भाजपच्या कलाकप्पा गुरुशांतप्पा बंडी यांना 70177 मतं मिळवता आली. उद्धव ठाकरे गटाचे कुमार अंदप्पा हकारी यांना अवघी 122 मते मिळाली. परिणामी त्यांचं डिपॉझिट जप्त झालं.


बेळगावातील खानापूर मतदारसंघात भाजपच्या विठ्ठल हलगेकर यांचा विजय झाला. त्यांनी काँग्रेसच्या डॉ. अंजली निंबाळकर यांचा पराभव केला. विठ्ठल हगलेकर यांना 91834 मते मिळाली आणि डॉ. अंजली निंबाळकर यांना 37205 मते मिळाली. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कृष्णाजी पाटील यांना 983 एवढी मते मिळाली, परं त्यांनाही आपलं डिपॉझिट राखता आलं नाही.




विजापूर शहर मतदारसंघात भाजपचे बसनागौडा पाटील विजयी झाले. त्यांना 94211 मते मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या अब्दुल मुश्रीफ ( 85978 मते) यांचा पराभव केला. या मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे सतीतश पाटील यांना अवघी 149 मते मिळाली. त्यामुळे त्यांचंही डिपॉझिट जप्त झालं आहे.





कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातून घालवू : उद्धव ठाकरे


ठाकरे गटाच्या आमदारांची काल (13 मे) मातोश्रीवर बैठक झाली. यात कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालावर चर्चा झाली. "दक्षिणेचा पट्टा भाजपच्या हातून निसटला आहे. भाजपला कर्नाटकात नाकारलं आहे. भाजप फोडाफोडीचं राजकारण करतं आहे, हे लोकांना आवडलेलं नाही. कर्नाटकातून घालवलं, आता महाराष्ट्रातूनही घालवू," असा विश्वास उद्धव ठाकरेंनी आमदारांना दिला.