Karnataka Elections: कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे ला मतदान होणार आहे... विधानसभा निवडणुकीसाठी धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. तिन्ही प्रमुख राजकीय पक्ष - भाजप, काँग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दल मतदारांना प्रचारसभांच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा शेवटचा प्रयत्न आज करतील. कॉग्रेसकडून राहुल गांधी आणि प्रियंका गांधींची आज प्रचार सभा, रोड शो, आणि पत्रकार परिषद होणार आहे. यावेळी सोनिया गांधी सुद्धा सहभागी होणार आहेत तर
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आज निपाणीत शरद पवार यांची सभा होणार आहे.
मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. 13 मे रोजी होणारी मतमोजणी विजय-पराजय ठरवेल, मात्र त्याआधी झालेल्या अंतिम जनमतच्या सर्वेक्षणातून राज्यात पुढचे सरकार कोणाचे स्थापन होणार याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सोनिया गांधीही निवडणुकीच्या प्रचारात
सोनिया गांधीही (Sonia Gandhi) काँग्रेसच्या प्रचारासाठी कर्नाटकात उपस्थित होत्या. काल (6 मे) सोनिया गांधींनी हुबळी येथे निवडणूक रॅलीला संबोधित केलं. त्यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) देखील उपस्थित होते. याशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधींच्या काल (6 मे) कर्नाटकात जाहीर सभा पार पडल्या.
गेल्या चार वर्षांत सोनिया गांधी पहिल्यांदाच प्रचारासाठी उपस्थित राहिल्यात. सोनिया गांधी यांनी हुबळी-धारवाड सेंट्रलमधून काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर (Jagdish Shettar) यांच्या बाजूनं जाहीर सभेला संबोधित केलं. भाजपकडून तिकीट न मिळाल्यानं जगदीश शेट्टर काँग्रेसमध्ये आले आहेत. तर, भाजपकडून हुबळी-धारवाड मतदारसंघातून महेश टेंगीनकाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
कर्नाटकांमध्ये डबल इंजिन सरकारचे सूत्र कायम
अन्य राज्यांप्रमाणे कर्नाटकांमध्ये डबल इंजिन सरकारचे सूत्र कायम ठेवावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी कर्नाटक प्रचारादरम्यान आवाहन केले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी शिंदे तेथे गेले आहेत. त्या निमित्ताने बंगळूरु येथील 103 वर्षे जुन्या असलेल्या महाराष्ट्र मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहून शिंदे यांनी मराठी बांधवांशी संवाद साधला.
10 मे रोजी कर्नाटकातील 224 सदस्यीय विधानसभेसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. त्याचा निकाल 13 मे रोजी जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एकूण 5,21,73,579 मतदार मतदान करणार असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :