Karnataka Election 2023 Date : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Election 2023) कधी होणार याबाबतचा सस्पेन्स आज संपणार आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाची (Election Commission of India) आज सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत निवडणूक आयोग कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल. त्यामुळे कर्नाटकात कोणत्या तारखेला मतदान (Voting) होणार आणि निकाल (Result) कधी लागणार हे आज सकाळी साडेअकरा वाजता स्पष्ट होणार आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होईल.


24 मे रोजी कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ संपणार


दरम्यान 2018 मधील कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम 27 मार्च रोजी जाहीर झाला होता. यंदा आज म्हणजेच 29 मार्च रोजी तारखा जाहीर केल्या जाणार आहे. कर्नाटकात 10 ते 15 मे दरम्यान मतदान होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही एकाच टप्प्यात मतदान घेण्याची घोषणा केली जाऊ शकते. विशेष म्हणजे कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ 24 मे रोजी संपत आहे.


2018 च्या निवडणुकांचा निकाल?


कर्नाटकमध्ये 2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नव्हतं. भाजपने 224 जागांपैकी 104 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसने 80 जागा आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या. परंतु सर्वात मोठा पक्ष असूनही भाजप सत्तेपासून दूर राहिला.


येडियुरप्पा यांच्या राजीनाम्यानंतर बोम्मई मुख्यमंत्रीपदी विराजमान


2018 च्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालं नाही, परंतु बीएस येडियुरप्पा यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, बहुमत सिद्ध करु न शकल्याने एका दिवसानंतरच त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केलं आणि जेडीएस नेते कुमारस्वामी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी आली. काँग्रेस आणि जेडीएसचे युतीचे सरकार 14 महिन्यांनंतर कोसळलं आणि त्यानंतर बीएस येडियुरप्पा यांनी काँग्रेसच्या बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र, नंतर भाजपने राज्याचे मुख्यमंत्री बदलले आणि बसवराज बोम्मई राज्याचे नवे मुख्यमंत्री झाले.


काँग्रेसकडून 124 उमेदवारांची यादी जाहीर


दरम्यान कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने नुकतीच 124 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये वरुणा विधानसभा मतदारसंघातून विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तसंच या यादीत बहुतांश जुने चेहरे काँग्रेसने कायम ठेवले आहेत. 


भाजप आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह


एकीकडे राज्यात निवडणुका होणार आहेत तर दुसरीकडे भाजप आणि काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत कलह सुरु आहे. माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा आणि विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यातील मतभेद मिटवण्यात भाजप गुंतली आहे. त्याचवेळी कर्नाटक प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना एकत्र आणण्यासाठी काँग्रेसचा प्रयत्न सुरु आहे.