Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी गेल्या महिन्याभरापासून सुरु आहे. अहिल्यानगरच्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात (Karjat Jamkhed Vidhan Sabha) महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवारांचे घोषणा होताच हा मतदारसंघ राज्यभर चर्चिला गेला. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार (Rohit Pawar) यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली. तर त्यांच्या विरोधात रोहित पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे राम शिंदे (Ram Shinde) यांना भाजपने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राम शिंदे आणि रोहित पवार यांनी एकमेकांवर सडकून टीका देखील केली. आज सकाळपासून राज्यातील 288 मतदारसंघांची मतमोजणी सुरु झाली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे रोहित पवार सुरुवातीला आघाडीवर होते. मात्र आता रोहित पवार हे पिछाडीवर आले असून राम शिंदे यांनी आघाडी घेतली आहे.
कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात 260380 इतकं मतदानं झालं होतं. कर्जत जामखेडमधील मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी 74.94 टक्के होती. कर्जत जामखेडमध्ये पुरुष मतदारांचं मतदान 139033 इतकं मतदान झालं आहे. तर, महिला मतदाराच्या मतदानाची संख्या 121347 इतकी आहे. पोस्टल मतदानामध्ये रोहित पवार आघाडीवर असल्याची माहिती आहे. सकाळी 8.44 वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार रोहित पवार 600 मतांनी आघाडी घेतली होती. मात्र, आता आलेल्या आकडेवारीनुसार रोहित पवार पिछाडीवर आहेत. भाजपचे राम शिंदे 634 मतांनी आघाडीवर आहेत. त्यामुळे आता या मतदारसंघाचा निकाल काय लागणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?
2019 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजपाचे तत्कालीनं मंत्री राम शिंदे यांचा पराभव केला होता. रोहीत पवार यांनी तब्बल 43,347 मतांनी राम शिंदे यांचा पराभव केला होता. 25 वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये रोहीत पवार यांनी भाजपचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मतं मिळाली आहेत. रोहित पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात मोठा जल्लोष करण्यात आला होता. विशेष म्हणजे विजयानंतर रोहित पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले होते. विजयानंतर रोहित पवार यांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला. निवडणूक पार पडली असून मतदार संघातील विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचे, अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना केली होती.
आणखी वाचा