पुणे: पुण्यातील वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर टिंगरे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी नोटीस पाठवली, असल्याची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रचारसभेच्या दरम्यान होती. त्यानंतर आमदार सुनील टिंगरे यांनी मी शरद पवारांना नोटीस पाठवली नसल्याची प्रतिक्रिया एबीपी माझाशी बोलताना दिली. त्यानंतर मंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन सुप्रिया सुळे यांनी माध्यमांसमोर सुनील टिंगरे यांनी पाठवलेली नोटीस दाखवली. मात्र सुनील टिंगरे यांनी शरद पवारांना नोटीस पाठवली नसल्याचा पुनरुच्चार केला आहे.


काय म्हणालेत सुनील टिंगरे?


मी आजही ठामपणे सांगतो. मी शरद पवारांना कुठलाही पत्र लिहिलेलं नाही. त्या पत्रामध्ये शरद पवारांचं नाव सुद्धा नाही. शरद पवार आजही आमच्यासाठी दैवत आहेत. एका प्रकरणात (Porsche Car) माझ्यावर ज्या पद्धतीने विरोधकांकडून आरोप केले जात होते, त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नव्हतं. त्या प्रकरणांमध्ये माझ्यावर कुठलाही गुन्हा दाखल नाही. आतापर्यंतच्या तपासात काहीही निष्पन्न झालेलं नाही तरी देखील माझी बदनामी केली जात होती. त्यासाठी मी महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या प्रमुखांना मी हे पत्र लिहून कळलं होतं. सुप्रिया सुळे मला टार्गेट करत आहेत, असंही पुढे टिंगरेंनी म्हटलं आहे.


सुप्रिया सुळेंनी दाखवली नोटीसची कॉपी 


मुंबईत पत्रकार परिषद घेत खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सुनील टिंगरे यांनी म्हटलं मी कोणतीही नोटीस पाठवली नाही. यामुळे या नोटीसची कॉपी मी इथे आणली आहे. यामध्ये शरदचंद्र पवार यांचं नाव आहे. त्यांच्या नावानीशी ही नोटीस पाठवण्यात आलेली आहे.  पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नोटीस पाठवली आहे. त्यात पोर्श कार अपघात प्रकरणात बिनशर्त माफी मागण्यात यावी, अशी मागणी देखील करण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.



नेमकं प्रकरण काय?


19 मे 2024 च्या मध्यरात्री पुण्यातील कल्याणीनगरमधे एका अल्पवयीन मुलाने त्याच्या तीन अल्पवयीन मित्रांसोबत दारु पार्टी केली. त्यानंतर दारुच्या नशेत पोर्शे कार भरधाव वेगात चालवून या अल्पवयीन मुलाने केलेल्या अपघातात अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधीया या दोन आयटी इंजिनियर्सचा बळी गेला. त्यानंतर जमावाने त्या अल्पवयीन मुलाला आणि त्याच्या मित्रांना पोलिसांच्या ताब्यात दिले. ही माहिती त्या अल्पवयीन मुलाचे वडील बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांना समजल्यावर त्यांनी स्थानिक आमदार  सुनिल टिंगरेंना फोन केला. त्यानंतर सुनील टिंगरे रात्री तिन वाजता येरवडा पोलीस स्टेशनला पोहचले. पहाटे तीन वाजेपर्यंत टिंगरे पोलीस स्टेशनला होते.


त्यानंतर त्या अल्पवयीन मुलांना वैद्यकिय तपासणीसाठी ससुन रुग्णालयात नेण्यात आले. तिथे ससुनमधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हरनोळ यांना हाताशी धरुन त्या अल्पवयीन मुलांच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले. पुढे पोलीस तपासात ही बाब समोर आल्यावर आमदार सुनिल टिंगरेंवर चहुबाजुंनी टिका सुरु झाली‌. येरवडा पोलीसांनी अल्पवयीन मुलाऐवजी त्यावेळी गाडीत शेजारी बसलेल्या ड्रायव्हरवर गुन्हा नोंद करावा यासाठी आमदार टिंगरेंनी प्रयत्न केल्याचा आणि पुढे ससुनमधे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला. पुढे पुणे पोलीसांनी आमदार टिंगरेंची या प्रकरणात चौकशी करुन त्यांचा जबाब देखील नोंद केला. अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यासोबत आपले व्यवसायिक संबंध होते आणि त्यामुळे आपण विचारपुस करण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यात गेलो होतो असा दावा सुनिल टिंगरेंनी केला. मात्र विरोधकांकडून सुनील टिंगरेंवर सातत्याने टिका करण्यात येऊ लागली.