कलिना हा मुंबई उपनगर जिल्ह्यातला उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातला हा विधानसभा मतदारसंघ आहे. सध्या या ठिकाणी शिवसेनेचे संजय पोतनीस आमदार आहेत. तर भाजपच्या पूनम महाजन या खासदार आहेत.
दोन लाख साठ हजारपेक्षा जास्त मतदार असलेल्या या विधानसभा मतदारसंघात क्षेत्रात मुस्लिम आणि ख्रिश्चन मतदारांची संख्या लक्षणीय आहे. या मतदार संघात काँग्रेस, राष्ट्रवादीचे नगरसेवक मोठ्या प्रमाणात असले २०१४ सालच्या मतदानाची आकडेवारी पाहता शिवसेना-भाजपच्या उमेदवारांना इथल्या मतदारांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं आहे.
काँग्रेसचे दिग्गज नेते कृपाशंकर सिंह हे २००९ साली या मतदार संघातून आमदार होते. २०१४ साली शिवसेनेने फॉर्म भरण्याच्या अवघ्या बारा दिवस अगोदर नगरसेवक संजय पोतनीस यांना उमेदवारी जाहीर केली. संजय पोतनीस यांनी ३०,७१५ मते मिळवून कृपा शंकर सिंह यांचा पराभव केला. कृपाशंकर सिंह यांचा हा पराभव इतका दारुण होता की ते या लढतीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. 2014 च्या लढतीत दुसऱ्या क्रमांकाची मते भाजपच्या अमरजित सिंह यांना पडली.
कृपाशंकर सिंह यंदाची निवडणूक काँग्रेसच्या तिकीटावर लढण्यासाठी इच्छुक नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे काँग्रेसतर्फे नगरसेवक अश्रफ आजमी या मतदार संघातून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. तर मुंबई महापालिकेतील मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे देखील या मतदार संघातून निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत.
कलिना हा तसा ज्येष्ठ काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांचा मतदारसंघ. ते २००९ साली या मतदार संघातून तब्बल ५१ हजार मतांनी निवडून आले होते. परंतु २०१४ साली संजय पोतनीस यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. भाजपचे अमरजित सिंग यांचा पोतनीस यांच्याकडून निसटता पराभव झाला. 2014 साली कलिना मतदारसंघातील लढत ही एक लक्षवेधी समजली जात होती, मात्र निकाल आल्यानंतर ही लढत फक्त शिवसेना-भाजप यांच्यातली असल्याचं उघड झालं. एवढी कृपाशंकर सिंह यांच्याविरोधात त्यांच्या मतदारांची नाराजी होती. संजय पोतनीस यांचा 1000 मतांनी निसटता विजय झाला.
२२८ बूथ असलेल्या या मतदार संघात चार काँग्रेसचे नगरसेवक आहेत. राष्ट्रवादी आणि मनसेच्या नगरसेवकांचा ही मोठा भाग या मतदार संघात येतो. परंतु गेल्या विधानसभेच्या मतदानाची आकडेवारी लक्षात घेतली तर शिवसेना-भाजप युतीमध्ये लढल्यास, युतीचा उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतो. युती झाली नाही तर मात्र शिवसेना-भाजप आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.