Maharashtra Vidhan Sabha Election 2024: आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात घडामोडींना वेग आला आहे. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याचा अवधी आता जवळ जवळ संपत आला आहे. अशातच बीड विधानसभा मतदारसंघातून (Beed Assembly Constituency) मोठी बातमी समोर आली आहे. आठवडाभरापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ज्योती मिटे (Jyoti Mete) यांनी आज बंडखोरी करत शिवसंग्राम (Shiv Sangram) पक्षाकडून बीड विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांना तिकीट देण्यात आलं. त्यानंतर ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाकडून आपल्या आज उमेदवारी अर्ज भरला आहे.


कोण आहेत ज्योती मेटे?


मराठा आरक्षणाबाबत कायम आग्रही भूमिका घेणारे शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत विनायक मेटे यांच्या ज्योती मेटे या पत्नी आहेत. त्या प्रशासकीय अधिकारी होत्या. गेल्या काही दिवसांपूर्वी ज्योती मेटे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या वेळीही त्यांनी शरद पवार गटासोबत चर्चा केली होती. त्यानंतर  त्यांनी थेट शरद गटात प्रवेश केला. मात्र अलिकडे त्यांना शरद पवार गटाकडून बीडमधून उमेदवारी देण्यात न आल्याने  त्यांनी वेगळा निर्णय घेत बंडखोरी केली आहे.


आष्टी मतदारसंघात धस, आजबे आणि धोंडे या नेत्यांमध्ये तगडी फाईट?


आष्टी मतदारसंघातून बंडखोरी करत अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आष्टी विधानसभा मतदारसंघातून सोमवारी भाजपकडून माजी आमदार सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरी करत अजित पवार गटाचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी देखील आष्टी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आष्टी मतदार संघात भाजपने सुरेश धस यांना उमेदवारी जाहीर करून या मतदारसंघातील पेच दूर केला. मात्र अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत आज आष्टी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर ज्योती मेटे यांनी शिवसंग्राम पक्षाकडून आपल्या आज उमेदवारी अर्ज भरला आहे.


तर दुसरीकडे भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांना देखील उमेदवारी न मिळाल्याने याच मतदारसंघांमध्ये धस, आजबे आणि धोंडे या तिघा नेत्यांमध्ये तगडी फाईट होणार आहे. चार तारखेला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. यादरम्यान पक्षाने समजूत काढल्यास नेमका कोणता उमेदवार उमेदवारी अर्ज मागे घेणार? याकडे देखील लक्ष असणार आहे. मात्र सध्या आष्टी मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी दिसून आली आहे.


हे ही वाचा