बीड : बीडच्या इतिहासात पहिल्यांदाच काका विरुद्ध पुतण्या निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. हे काका-पुतणे एकमेकांच्या विरोधात टोकाचा प्रचार करत आहेत. तरी रात्री मात्र एकाच बंगल्यात राहायला असतात. हा बंगला आहे बीडच्या क्षीरसागर कुटुंबाचा. जिथे शिवसेनेकडून जयदत्त क्षीरसागर तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून संदीपसिंह क्षीरसागर हे निवडणूक लढत आहेत.


बीड शहरातील नगर रोड वरचा हा बंगला म्हणजे बीड शहरातील राजकारणाच्या घडामोडींचे प्रमुख ठिकाण आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी अशा दोन्ही राजकीय नेत्यांचे आश्रयस्थान म्हणजे हा बीडचा बंगला. राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो अथवा शिवसेनेचा, त्यांना त्यांच्या नेत्याला भेटायचं असेल तर याच बंगल्यावर यावं लागतं.

बीड नगरपालिकेच्या निवडणुकीवरुन क्षीरसागर कुटुंबामध्ये फूट पडली आणि संदीप क्षीरसागर यांनी जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यापासून फारकत घेतली. त्याचवेळी संदीप क्षीसागर यांना राष्ट्रवादीकडून बळ मिळालं आणि जयदत्त क्षीरसागर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत सेनेमध्ये प्रवेश केला. या नेत्यांचे पक्ष वेगळे आहेत, नेते वेगळे आहेत आणि कार्यकर्तेही वेगळे आहेत. मात्र या नेत्यांचे घर एकच आहे.

बीडच्या या बंगल्यात चार भावांची एकूण दहा कुटुंबं राहतात. या बंगल्यात जाण्या-येण्यासाठी दोन रस्ते आहेत. विशेष म्हणजे सर्वांचे स्वयंपाकघर एकच आहे. तिथले कर्मचारी मात्र वेगवेगळे आहेत. घरातील लँडलाईन फोनही वेगवेगळे आहेत. असे असले तरी सर्वांच्या गाड्यांच्या पार्किंगची जागा मात्र एकाच ठिकाणी आहे.

सध्या प्रचार जोरावर असल्याने दोन्ही उमेदवार सकाळी लवकरच बंगल्यातून बाहेर पडतात. संपूर्ण मतदारसंघ फिरुन एकमेकांविरोधात प्रचार करणारे हे दोन्ही उमेदवार एकाच गेटमधून बाहेर पडतात. सुरवातीच्या काळामध्ये कार्यकर्ते थोडे बुचकळ्यात पडायचे, मात्र आता भूमिका ठरल्याने कार्यकर्त्यांनीसुद्धा आपले नेते वाटून घेतले आहेत. राजकीय महत्त्वकांक्षेमुळे कुटुंब विभक्त झाले आणि एकमेकांविरोधात आता टोकाचा प्रचारही करू लागले आहेत.

मागी दोन-अडीच वर्षापासून संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपले बस्तान बसवले आहे. अगदी बीड नगरपालिकेत दोन्ही काकांना धोबीपछाड देत संदीप क्षीरसागर यांनी सर्वात जास्त नगरसेवक निवडून आणले. शिवाय जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतसुद्धा काकांच्या राजकारणाला धक्का देत विजय संपादन केला. आता पुन्हा हे काका-पुतणे आमने-सामने उभे आहेत. इतर उमेदवारांप्रमाणे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात जे जे काही राजकीय प्रचार करायचे असतात ते सगळे करून झाल्यावर हे उमेदवार रात्री मात्र एकाच छताखाली येतात, हेही नसे थोडके...

व्हिडीओ पाहा : बीडमध्ये काका-पुतण्या आमने सामने