सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सोलापूर उत्तरमध्ये महेश कोठे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत जयंत पाटील यांनी विविध मुद्यांवरुन महायुतीवर हल्लाबोल केला. महाराष्ट्रातील सरकार खोके देऊन पाडण्यात आलं. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीत भ्रष्टाचार या लोकांनी केल्याचा आरोप जयंत पाटील यांनी केला.
महाराष्ट्रमध्ये चांगलं सुरु असलेलं सरकार यांनी खोके देऊन पाडलं. थोड्या दिवसात भाजपने पुढाकार घेऊन राष्ट्रवादी फोडली असा आरोप जयंत पाटील यांनी केला. त्यानंतर भाजपला एकनाथ शिंदे आणि अजित पवार त्यांच्या सहकाऱ्यांसह साथ लाभली, असं त्यांनी म्हटलं.
महागाईतून जनतेला बाहेर काढण्यासाठी महत्वाच्या पाच वस्तूंचे दर आम्ही निश्चित करण्याचे आश्वासन दिले आहे. पंचसूत्री आम्ही जाहीर केली आहे. महालक्ष्मी योजना माध्यमातून 3 हजार रुपये महिलांना देणारं, महिलांच्यासाठी एसटी मोफत करणार, शेतकऱ्यांना तीन लाखांची कर्जमाफी, युवकांना 4 हजार रुपयांची बेरोजगार भत्ता देणार आहोत. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सरकार आल्यावर आम्ही जातनिहाय जणगणना करू, यामुळे राज्यातील प्रत्येक छोट्या समाजाची गणना होईल. लहान समाजासाठी सरकार म्हणून बरेच काही करता येईल, असं जयंत पाटील म्हणाले.
नरेंद्र मोदींनी पाच लाख रुपयांची वैद्यकीय बिल द्यायची गरज पडणार नाही, असे सांगितलं पण त्याचा कोणाला लाभ झाला नाही. आम्ही ठरवलंय प्रत्येक कुटुंबाचा 25 लाखांचा आरोग्य विमा काढायचा, असं जयंत पाटील म्हणाले. तुम्ही मुंबईच्या ब्रिच कँडी हॉस्पिटलला गेलात तरी त्याचा भार आरोग्यविमा माध्यमातून सरकार उचलेल, पाटील यांनी म्हटलंय. हे भ्रष्ट मार्गाने आलेले सरकार आहे, ते घालवल्या शिवाय आता पर्याय नाही. या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे, असं जयंत पाटील म्हणाले.
भ्रष्टाचारामध्ये यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोडला नाही
गुजरातला फॉक्सकॉन गेलं. दीड लाख तरुणांना नोकऱ्या लागल्या असत्या पण मुख्यमंत्र्यानी विरोध ही केला नाही. मोदींनी त्यांना सांगितलं म्हणे की यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ पण तो प्रकल्प अजून आलेला नाही. म्हणजेज यांच्या हातात भोपळा देण्यात आलाय, असं जयंत पाटील म्हणाले. गुजरातचे दरदोई उत्पन्न हे महाराष्ट्रपेक्षा पुढे आहे.मी अर्थमंत्री असताना आपलं दरडोई उत्पन्न जे जास्त होतं. महाराष्ट्राचं उत्पन्न दोन टक्के कमी झाले याला जबाबदार एकनाथ शिंदे यांचे सरकार आहे, असा आरोप देखील पाटील यांनी केला.
एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे लोक दावोसला गेले, अनेक गुंतवणूक आल्या म्हणून पुड्या सोडल्या. पण, गुंतवणूक आलेली नाही तर उलट तिथल्या हॉटेल वाल्याने बिलं पाठवले की राहिलेलं बिलं पाठवा, अशी टीका जयंत पाटील यांनी केला. ठाण्यात बिलं न देता हॉटेलला जाण्याची सवय झालेली तेच कामं दावोसमध्ये केलं, महाराष्ट्रची किती मानहानी करायची? असा सवाल देखील करण्यात आला आहे.
शेवटच्या आठ दिवसात पैशांचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज जयंत पाटील यांनी व्यक्त केला. भ्रष्टाचारामध्ये यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा देखील यांनी सोडला नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. दहा वाजत आल्यानं जयंत पाटील घड्याळ चोरीला गेलेल असलं तरी मला वेळ कळते, असा टोला लगावला.
जयंत पाटील पुढे म्हणाले, घरी गेल्यावर सांगा दाढी वाला बाबा 1500 देतो म्हणतोय आणि आज आलेला बाबा तीन हजार देतो म्हणतोय हे निरोप द्या. 1500 जास्त की तीन हजार जास्त तुम्ही सांगा, ज्यांना तीन हजार हवेत त्यांनी हात वर करा, असंही ते म्हणाले. सोलापुरातील बलिदान चौक हा क्रांतीचे प्रतीक असलेला चौक आहे, अशीच क्रांती विधानसभा निवडणूक मध्ये महेश कोठे यांच्या रूपाने होईल, असं जयंत पाटील म्हणाले.
ज्यांच्यावर आरोप केले त्यांना सत्तेत घेतलं
छगन भुजबळ म्हणतात ओबीसी होतोय म्हणून केंद्रीय संस्थानी मला त्रास दिला, अजितदादांसोबत गेलेले लोकं का गेली हे यातून स्पष्ट होतं, असंही जयंत पाटील म्हणाले. प्रधानमंत्री म्हणतात 70 हजार कोटींचा घोटाळा केला आणि नंतर तेच त्यांच्यसोबत सत्तेत गेले. नवाब मलिक यांच्यावर देशद्रोहचे आरोप करण्यात आले, त्यांना वाळीत टाकण्यात आलं. काल परवा यादी झाली. युतीमधून नवाब मलिक यांना तिकीट देण्याचा निर्णय झाला आणि हे भाजपला मान्य झालं,म्हणजे ज्याच्यावर देशद्रोहाचा आरोप केलेत ते आता तुम्हाला मान्य झालं, हे आरोप आम्ही नाही केले तुम्हीच केले होते. एकावर एक फ्री म्हणजे केवळ नवाब मलिक नाही तर त्यांच्या मुलीला ही तिकीट दिलं गेलंय.हे भ्रष्ट मार्गाने आलेले सरकार आहे, ते घालवल्या शिवाय आता पर्याय नाही. या सरकारला त्यांची जागा दाखवण्याची वेळ आता आली आहे, जयंत पाटील म्हणाले.
इतर बातम्या :