नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव झाला. जनसुराज पक्षानं रविवारी एक मोठा दावा केला आहे, त्या दाव्यानुसार जागतिक बँकेनं दुसऱ्या प्रकल्पासाठी दिलेला निधी बिहारच्या महिला मतदारांकडे वळवण्यात आल्याचा दावा केला. जनसुराजच्या या दाव्यावर चिराग पासवान यांनी प्रतिक्रिया देत तो फेटाळून लावला. 

Continues below advertisement

जन सुराज पक्षाचे प्रवक्ते पवन वर्मा यांनी मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु करणे आणि त्याद्वारे पैसे पाठवण्याच्या वेळेवर प्रश्नचिन्ह उभं केलं. आचारसंहिता लागू होण्यापूर्वी योजनेची अंमलबजावणी सुरु करण्यात आल्याचं ते म्हणाले. 

जागतिक बँकेनं 21000 कोटी एका प्रकल्पासाठी मंजूर केले होते. त्यापैकी 14000 कोटी रुपये महिलांना 10-10 हजार रुपये देण्यासाठी वापरण्यात आल्याची माहिती पक्षाला मिळाल्याचा दावा जनसुराज पक्षानं केला. 

Continues below advertisement

बिहार राज्यावरील कर्जाचा बोजा 4,06,000 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. पत्येक दिवसाचं व्याज 63 कोटी रुपये झालं आहे. राज्याची तिजोरी रिकामी आहे. आम्हाला जी माहिती मिळालीय ती चुकीची असू शकते. मात्र, महिलांना 10-10 हजारांची रक्कम देण्यात आली ती रक्कम जागतिक बँकेकडून दुसऱ्या प्रकल्पासाठी आलेल्या 21000 कोटी रुपयांमधून देण्यात देण्यात आले. आचारसंहिता  लागू होण्यापूर्वी 14000 कोटी रुपये काढून  राज्यातील 1.25 कोटी महिलांना ती रक्कम वाटण्यात आली. जनसुराजचे प्रवक्ते पवन वर्मा यांनी एएनआय सोबत बोलताना दावा केला. 

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी हे आरोप फेटाळले आहेत. या आरोपांच्या विश्वासार्हतेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं.  या आरोपांमागील हेतूवर देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.  त्यांना हा डेटा आणि ही माहिती कोठून मिळाली, असा सवाल चिराग पासवान यांनी केला. तुमच्याकडे काही पुरावे असतील ते समोर आणावेत, सरकार त्याला प्रतिसाद देईल असं लोक जनशक्ती पार्टी रामविलासचे प्रमुख चिराग पासवान म्हणाले. 

प्रशांत किशोर यांच्या दारुबंदी उठवण्यासंदर्भातील घोषणेचा फटका बसल्याचं मान्य करण्यास जनसुराजच्या प्रवक्त्यांनी नकार दिला. दारु बंदी अपयशी ठरली असून प्रत्येक कोपऱ्यावर दारु विकली जात आहे. महाग दरात दारु घरपोहोच दिली जात असल्याचं जनसुराजनं म्हटलं. बंदी कायद्यानुसार दलित समुदायातील 2 लाख  लोकांना तुरुंगात पाठवलं गेलं. लोक दारुसाठी अधिक पैसे मोजत आहेत, हे महिलांवर परिणाम करत नाही का? असा सवाल जनसुराज पक्षाच्या प्रवक्त्यांनी केला.   

जनसुराज पक्षानं 243 जागांवर निवडणूक लढवली मात्र त्यांना एकाही जागेवर विजय मिळाला नाही.  अखेरच्या क्षणी आणलेली महिला केंद्रीत  योजना आणि जंगलराज परत येण्याची भीती दाखवली गेल्याचा परिणाम झाला. नितीश कुमार एक्स फॅक्टर ठरले, बिहारच्या लोकांना लालू प्रसाद यादव, तेजस्वी यादव यांचं जंगलराज पुन्हा नकोय, असं जनसुराजचे प्रवक्ते वर्मा म्हणाले. 

एनडीएनं बिहार विधानसभा निवडणुकीत 202 जागांवर विजय मिळवला. 2010 मध्ये एनडीएनं 206 जागांवर विजय मिळवला होता. राजदनं 25 तर काँग्रेसनं 6 जागांवर विजय मिळवला आहे.