जळगाव : तिकीट कापल्यानंतर होणारं नाराजीनाट्य काही नवीन नाही. जळगावातील भाजपचे विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांनीही उमेदवारी नाकारल्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी घात केल्याची सल अशोक पाटील यांनी बोलून दाखवली आहे.
मतदारसंघात माझे चांगले काम आहे. सलग दोन वेळेला मी भरघोस मतांनी विजयी झालो होतो, तरीही माझं तिकीट कापलं जाणं, हा माझ्यावर मोठा अन्याय आहे, अशा भावना अशोक पाटील यांनी व्यक्त केल्या. गिरीश महाजनांनी जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या मदतीने माझा घात केला, असा आरोपही पाटलांनी केला. भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर पारोळ्यात झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार ए. टी. पाटील यांना डावलून आमदार स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे. त्यानंतर आपली भूमिका मांडण्यासाठी पाटील यांनी पारोळा शहरात कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यावेळी जळगाव जिल्ह्यातील माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भाजपकडे अजूनही वेळ आहे, त्यांनी माझ्या नावाचा विचार करावा. कार्यकर्त्यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांना ट्वीट करुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार बदलण्याची मागणी करावी, असं आवाहनही अशोक पाटलांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
गिरीश महाजनांनी घात केला, तिकीट कापल्याने भाजपचे विद्यमान खासदार एटी नाना पाटलांची खदखद
चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव
Updated at:
27 Mar 2019 08:56 AM (IST)
भाजपकडे अजूनही वेळ आहे, त्यांनी माझ्या नावाचा विचार करावा. कार्यकर्त्यांनीही नरेंद्र मोदी, अमित शाह यांना ट्वीट करुन जळगावातील उमेदवार बदलण्याची मागणी करावी, असं आवाहन तिकीट नाकारलेले भाजपचे विद्यमान खासदार अशोक पाटील यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -