मुंबई : मुंबईत सध्या एका जागेची चर्चा सगळ्यात जास्त सुरु आहे ती म्हणजे वरळी. जे ठाकरे कुटुंब नेहमीच निवडणुकांपासून कायम दूर राहिले. त्याच कुटुंबातील पहिले ठाकरे म्हणजे आदित्य ठाकरे वरळीतून निवडणूक लढवणार आहेत. शिवसेनेन या निवडणुकीची व्यूहरचना इतकी नीट केली की निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार आणि मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांचा प्रवेश शिवसेनेत झाला. अध्यक्ष पक्ष सोडून जाणे हा धक्का राष्ट्रवादीला मोठा होता. त्यात वरळीत आदित्य ठाकरे यांच्या विरोधात कोण उमेदवार द्यायचा यातही राष्ट्रवादीतील गटबाजी समोर आली आहे.

प्रदेशाध्यक्ष विरुद्ध मुंबई अध्यक्ष असा हा सामना राष्ट्रवादीत रंगला आहे. सुप्रिया सुळे यांच्या विश्वासू आणि जयंत पाटील यांच्या टीममधील अदिती नलावडे यांचे नाव पुढे आले होते. तर मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांच्याकडून सुरेश माने यांचे नाव पुढे आले. सुरेश माने हे पेशाने वकील असून ते आधी बसपा पक्षात होते. नंतर त्यांनी स्वतःची बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी काढली. मुंबई राष्ट्रवादीने ही जागा या पक्षाला देण्याचा निर्णय केला होता. पण प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या गोटातून अदिती नलावडेचे नाव पुढे करण्यात आले.

Assembly Election 2019 | कोणाला विरोध म्हणून निवडणूक लढणार नाही : धनंजय मुंडे | ABP Majha



अदिती ही शिवसेनेचे दिवंगत नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दत्ताजी नलावडे यांची पुतणी आहे. अदिती ही सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या टीममध्ये काम करते. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मातोश्रीवर जे आंदोलन झाले त्यात अदिती नलावडे अग्रभागी होती. काल संध्याकाळी झालेल्या बैठकीत अदितीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार देखील मध्यरात्री या मतदारसंघात फिरुन आले. पण मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी या उमेदवारीवर आक्षेप घेतला आणि अॅडव्होकेट सुरेश माने यांना उमेदवारी देण्याची भूमिका घेतली.

अखेरीस मुंबई अध्यक्षांच्या  मागणीनुसार अॅडव्होकेट सुरेश माने यांना अजित पवारांनी एबी फॉर्म दिला. एकीकडे पक्षाला लागलेली गळती, चांगल्या उमेदवारांची वानवा असताना उमेदवारी ठरवताना देखील नेत्यांमधील गटबाजी आणि मतभेद दिसून आले. चार ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असतानाही शेवटच्या क्षणी वरळी मधील उमेदवारी ठरवण्यात आली.

Ramesh Kadam | जामीनावर सुटलेल्या आमदाराचं मतदारसंघात जंगी स्वागत, 500 किलोचा हार घालणार