Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि राजकारणाची खिचडी झाली असतानाच 65.1 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. दोन्ही पक्षांचे मतदार घराबाहेर पडल्याचे दिसून येत आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात (Kolhapur) झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालं आहे.  


तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला 


2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे राज्यातील 100 विधानसभा जागांवर निकराची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत (Loksbha Election) महाराष्ट्रातील (Maharashtra) मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला आहे. यापूर्वी 1995 मध्ये राज्यात विक्रमी 71.69 टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, महाराष्ट्रात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय 23 नोव्हेंबरला होणार आहे.


मतदानाची टक्केवारी का वाढली?


विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीने आक्रमक प्रचार केल्याचे जाणकारांचे मत आहे. भाजपच्या 'बनतेंगे तो काटेंगे' आणि 'एक है तो सेफ हैं'च्या घोषणांना महाविकास आघाडीने महाराष्ट्र धर्म बिंबवताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भावनिक आवाहनाने समर्थकांना घराबाहेर पडण्यास भाग पाडलं आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 8.85 कोटी मतदार होते, जे आता 9.5 टक्क्यांनी वाढून 9.69 कोटी झाले आहेत.


वाढलेल्या मतांचा फायदा कोणाला होणार?


मतदानाचा टक्का वाढला की सत्ता बदलते, असा निवडणुकीचा कल राहिला आहे. मतांची टक्केवारी वाढल्यानंतर सत्ता बदलली आणि अनेक वेळा सत्ताधारी आघाडीलाही फायदा झाला. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढले आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.39 टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीला 43.91 टक्के, तर महायुतीला 42.71 टक्के मते मिळाली होती. 


2004 मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला होता. 2004 मध्ये 63.44 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आणि सत्ताधारी आघाडीचे पुनरागमन झाले. शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या. 2014 च्या निवडणुकीतही मतदानात चार टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदलले होते. 2014 मध्ये 63.38 टक्के मतदानानंतर भाजप 125 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत 63 जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले होते. 


कमी मतदान होऊनही सत्ता बदलली नाही


महाराष्ट्राच्या गेल्या 30 वर्षांच्या निवडणूक इतिहासात असे प्रसंग आले आहेत की कमी मतदान होऊनही सरकार निवडून आले. मतदानाची टक्केवारी घसरली असतानाही 2009 मध्ये राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडी पुन्हा सत्तेत आली. 2009 मध्ये 59.68 टक्के मतदान झाले होते. मतदानाची टक्केवारी घसरल्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेसला झाला. काँग्रेसने 82 तर राष्ट्रवादीने 62 जागा जिंकून सत्तेत पुनरागमन केले. विरोधात बसलेल्या शिवसेना आणि भाजपला एकूण 110 जागा मिळाल्या. त्यावेळी मनसेने 13 जागा जिंकून महायुतीला धक्का दिला होता. 2019 मध्ये देखील 61.44 टक्के मतदान झाले, जे मागील निवडणुकीच्या तुलनेत 2 टक्के कमी आहे, परंतु सरकार बदलले नाही. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेच्या जागा कमी झाल्या.


1995 च्या निवडणुकीत काय झाले? 


वास्तविक, महाराष्ट्रात 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्या. 12 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात आणि 9 मार्चला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. 13 मार्च रोजी निकाल लागला. या निवडणुकीत प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस यांच्यात होती. 1995 मध्ये 71.69 टक्के बंपर मतदान झाले होते, तेव्हा जनादेश शिवसेनेच्या बाजूने आला होता. त्यावेळी शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी जोरदार प्रचार भाजपकडून केला होता. 


1995 मध्ये कोणाची स्थिती होती?


महाराष्ट्रात 1995 च्या निवडणुकीत काँग्रेस 80 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला. मात्र शिवसेना आणि भाजपला युतीचे सरकार स्थापन करण्यात यश आले. त्यावेळी शिवसेनेला 73 तर भाजपला 65 जागा मिळाल्या होत्या. तर मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास काँग्रेसला 31 टक्के, शिवसेनेला 16.4 टक्के आणि भाजपला 12.8 टक्के मते मिळाली. त्या निवडणुकीत कोल मतदारांची संख्या 5,50,93,862 होती आणि 3,94,98,861 मतदारांनी मतदान केले होते.


इतर महत्वाच्या बातम्या