Andheri East Bypoll : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East Bypoll 2022) उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस उरले असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यात ही निवडणूक भाजपऐवजी (BJP) शिंदे गट (CM Eknath Shinde) लढण्याची शक्यता आहे. एकिकडे राज्याचा राजकीय वर्तुळात ठाकरे गटाच्या (Uddhav Balasaheb Thackeray) उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) पाच दिवसांपूर्वी मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्याची चर्चा आहे. तसेच, लटके यांना शिंदे गटात (Shinde Group) वळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम देत, आमची निष्ठा ठाकरेंसोबत असा निर्धार व्यक्त केला आहे. अशातच ऋतुजा लटके यांचा राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. याविरोधात ठाकरे गटानं न्यायालयात धाव घेतली आहे. असं असलं तरी ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर झाला नाही, तर पुढे काय? याची तयारीही ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज आणि उद्याचाच दिवस आहे. आणि त्यावरून रंगलेल्या राजकारणामुळे उमेदवाराबाबतची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके यांचा नोकरीचा राजीनामा महापालिकेनं अद्याप मंजूर केला नसल्यानं त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. त्यावर कोर्ट काय निर्णय घेणार यावर लटके यांच्या उमेदवारीचं भवितव्य अवलंबून आहे. एकीकडे लटकेंकडून उमेदवारीसाठी कोर्टकचेऱ्या सुरु असताना शिवसेनेनं आता अन्य पर्यायांची चाचपणी सुरु केली आहे. त्यात लटकेंचे निकटवर्तीय माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. याशिवाय लटके यांच्या मातोश्री आणि बंधुंच्या नावाचीही चर्चा आहे.
ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याहून राजकारण सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राजीनामा मंजूर होत नसल्यानं ठाकरे गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण जर राजीनामा मंजूर झालाच नाहीतर, मग ठाकरे गटाची पुढची रणनिती काय असणार? कोणाला उमेदवारी मिळणार? यासाठी ठाकरे गटानं प्लान बी तयार केला आहे. ठाकरे गटाकडून तीन पर्यायांचा विचार सुरू आहे. त्यामधील पहिलं नाव संदीप (राजू) नाईक. हे प्रभाग 81 चे नगरसेवक आहेत. तसेच दिवंगत आमदार रमेश लटके यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. ठाकरे गटाकडून यांच्या नावाचा विचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
याव्यतिरिक्त आणखी दोन पर्याय ठाकरे गटानं ठेवल्याची माहिती मिळत आहे. ऋतुजा लटके यांच्या राजीनामा प्रकरणाचा निवाडा झाला नाहीतर त्यांच्या सासुबाई आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या मातोश्री यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी दिली जाऊ शकते. तसेच, ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या बंधूंच्या नावाच्या पर्यायाचाही विचार सुरु आहे.
अंधेरी पूर्वची जागा भाजप शिंदे गटाला सोडणार?
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजप माघार घेऊन शिंदेंच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ही जागा सोडली जाऊ शकते अशी चर्चा आहे. त्यामुळ अंधेरी विधानसभा पोटनिवडणूक शिंदे गट लढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भाजपाचे दावेदार उमेदवार मुरजी पटेल हे निवडणुकीतून माघार घेणार का? हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
निवडणूक आयोगाच्या भूमिकेमुळेच शिंदे गटाला आमची रणनिती कळाली; ठाकरे गटाचे गंभीर आरोप