Haryana Assembly Election 2024 चंदीगड : हरियाणाच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या असून मतदानासाठी 15 दिवसांचा कालावधी बाकी आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान 5 ऑक्टोबरला होणार आहे. या निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप नेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे रमित खट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा युवक काँग्रेसनं रमित खट्टर यांच्या प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  


रोहतक येथील आमदार भारत भूषण बत्रा यांच्या उपस्थितीमध्ये रमित खट्टर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. रमित खट्टर यांचा काँग्रेस प्रवेश राज्याच्या राजकारणातील मोठी घटना मानली जात आहे. भाजपसाठी हा मोठा धक्का असल्याचं देखील बोललं जातंय. हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीवर रमित खट्टर यांच्या काँग्रेस प्रवेशाचा किती परिणाम होतो हे विधानसभा निवडणुकीनंतर पाहायला मिळेल.   


हरियाणा युवक काँग्रेसनं एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली आहे. मनोहरलाल खट्टर यांचे पुतणे रमित खट्टर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसमध्ये त्यांचं मनापासून स्वागत करतो, असं लिहिण्यात आलं आहे. रमित खट्टर हे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारमधील मंत्री मनोहरलाल खट्टर यांचे भाऊ जगदीश खट्टर यांचे पुत्र आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रमित खट्टर यांचा काँग्रेस प्रवेश भाजपसाठी धक्का मानला जात आहे. 


हरियाणा विधानसभा निवडणुकीत राजकारण जोरदार तापलं आहे. भाजपकडून पुन्हा एकदा सत्ता मिळवण्याचा प्रयत्न आहे. तर,दुसरीकडे काँग्रेसचा देखील सत्ता मिळवण्यासाठी जोरदार संघर्ष सुरु आहे. आम आदमी पार्टी देखील या निवडणुकीच्या माध्यमातून हरियाणात पक्षाचा विस्तार करण्याच्या प्रयत्नात आहे. 


लोकसभा निवडणुकीप्रमाणं आम आदमी पार्टी आणि काँग्रेस यांची आघाडी होणार होती. मात्र, जागा वाटप आणि इतर मुद्यांवर एकमत न झाल्यानं दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे उमेदवार दिले. हरियाणात एका टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. 5 ऑक्टोबरला 90 जागांवर मतदान होणार आहे. तर, मतमोजणी 8 ऑक्टोबरला होईल. 


दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणुकीत हरियाणाच्या जनतेनं त्रिशंकू कौल दिला होता. भाजपनं जेजेपीच्या सहकार्यानं हरियाणात सत्ता स्थापन केली होती. गेल्या काही दिवसांमध्ये जेजेपी आणि भाजपमध्ये मतभेद निर्माण झाल्याचं  देखील पाहायला मिळालं होतं. भाजपनं मनोहरलाल खट्टर यांना केंद्रात मंत्रिपद दिलं आणि राज्यात नवा चेहरा दिला होता. 




इतर बातम्या : 


 Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?