या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करुन राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण ठरणार आहे. दरम्यान, इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून लढवावी, असा आग्रह इंदापूर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांचा असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना लोकसभेला आम्हाला मदत करा, आम्ही विधानसभेची जागा सोडू, असा शब्द दिल्याची चर्चा आहे.
परंतु आता इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार नसल्याचे संकेत असल्याने इंदापूर तालुक्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. इंदापूर विधानसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडून हर्षवर्धन पाटील यांना सोडण्यात येणार नाही, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने शिवस्वराज्य यात्रेची सभा इंदापूर येथे घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा उद्देश स्पष्टपणे दिसून येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलेला शब्द हा पाळला जात नसल्याचा इतिहास असल्याने इंदापूर विधानसभेची जागा हर्षवर्धन पाटील यांनी भाजपकडून लढवण्याचा निर्णय या मेळाव्यात होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
काही दिवसांपूर्वी हर्षवर्धन पाटील यांनी वर्षा बंगल्यावर सीएम देवेंद्र फडवणीस यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरु आहेत. इंदापूर विधानसभा मतदार संघाची काँग्रेस की राष्ट्रवादीला जाणार याबाबत अजूनही चित्र अस्पष्ट आहे. दत्ता भरणे की हर्षवर्धन पाटील यावरून आघाडीत राजकीय कलह सुरु आहे. त्यामुळे पाटील या मेळाव्यात काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.