छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगरच्या कन्नड मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार आणि भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव (Sanjana Jadhav) यांना रविवारी प्रचारसभेत बोलताना अश्रू अनावर झाले. यावेळी संजना जाधव यांनी त्यांचे पती हर्षवर्धन जाधव (Harshvardhan Jadhav) यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले. रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) हे केवळ एका लेकीचा बाप होता म्हणून शांत राहिले, असेही संजना जाधव यांनी म्हटले. कन्नड मतदारसंघात (Kanna अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव आणि शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार संजना जाधव यांच्यात लढत आहे. या पार्श्वभूमीवर संजना जाधव यांचे प्रचारसभेतील भावनिक भाषण प्रचंड गाजत आहे.
संजना जाधव यांनी प्रचारसभेत सांगितले की, हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत लग्न झाल्यानंतर मी खूप काही सोसले. मी लग्न होऊन एका महिन्यात घरी आले. वडिलांना याबाबत सांगितलं तर म्हणाले, तुला एक मूल होऊ दे, मूल झाल्यावर हा माणूस सुधारेल. मूल झाल्यावर माझे वडील म्हटले, चाळिशी झाली की माणूस सुधरत असतो. चाळिशी झाली, जे सहन केलं त्याचा मोबदला मला मिळाला नाही पण माझ्या जागेवर कोण आणलं हे तुम्हाला माहिती आहे. यानंतर पुढे बोलताना संजना जाधव यांना रडू कोसळले.
माझ्या वडिलांवर वाटेल ते आरोप झाले. परंतु, आम्ही सहन केले, कारण एका लेकीच्या बापाने ते सहन करायचे असतात. मुलाचा बाप असता तर रस्त्यावर उतरला असता. मुलीचा बाप होता म्हणून शांत बसला. आपली मुलगी तिकडे नांदतेय, म्हणून ते काहीच बोलले नाहीत. आपले संस्कारच आहेत, आई म्हणाली होती, आता तू घरातून जात आहेत. तू परत येशील तेव्हा तिरडीच आली पाहिजे, तू एकटी नाही आली पाहिजे, असं आईने म्हटलं होतं. त्याप्रमाणे मी संसार केला, पण मला काय मिळालं. मी आतापर्यंत कधीच रडले नाही, कधीच कुठल्या गोष्टीची वाच्यता केली नाही, हे गाव माझं म्हणून भरुन आलं. मी काय केलं आणि काय केलं नाही हे सगळ्यांना माहिती आहे, असे संजना जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आणखी वाचा