नवी दिल्ली : पाटिदार समाजाचा नेता हार्दिक पटेल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर ही मोठी घडामोड मानली जात आहे. गुजरातमधील जामनगर मतदारसंघातून तो निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत आहेत.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हार्दिक पटेल 12 मार्चला पक्षप्रवेश करण्याची शक्यता 'पीटीआय'ने वर्तवली आहे. अहमदाबादमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीवेळी हा प्रवेश होण्याची चिन्हं आहेत.

गुजरातमध्ये पाटिदार समाजाला आरक्षणाची मागणी करण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वात मोठं आंदोलन छेडण्यात आलं होतं. त्याच्या लोकप्रियतेचा फायदा उचलण्याचा काँग्रेसचा मानस असेल.

पंतप्रधान मोदींच्या घरच्या मैदानाकडे काँग्रेसने मोर्चा वळवला आहे. त्यामुळे गुजरातमधून तगडे उमेदवार देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असेल. गुजरात विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसने भाजपला कडवी झुंज दिली होती.

जामनगर लोकसभा मतदारसंघातून सध्या जपच्या पूनमबेन माडम खासदार आहेत. काँग्रेस उमेदवार विक्रमभाई अहिर यांचा जवळपास पावणे दोन लाखांच्या मताधिक्याने त्यांनी पराभव केला होता.