Gujarat Result 2022: गुजरातमध्ये विधानसभेच्या (Gujarat Election Result 2022) 182 जागांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला (BJP) बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. गुजरातमध्ये (Gujarat News) बहुमतासाठी 92 जागांची गरज आहे, तर येथे समोर आलेल्या कलांनुसार भाजप सध्या 150 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसची (Congress) मात्र दाणादाण उडाल्याचं पाहायला मिळत आहे. समोर आलेल्या कलांमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं दिसत आहे. तर काँग्रेसच्या जागा मोठ्या प्रमाणावर घटल्या आहेत. तर, आम आदमी पार्टी सध्या 6 जागांवर पुढे आहे.


काँग्रेसनं स्वीकारला पराभव, 1990 नंतरची सर्वात वाईट कामगिरी


कल पाहता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी पराभव स्वीकारला आहे. एबीपी न्यूजशी बोलताना त्यांनी जनादेश स्वीकारणार असल्याचं म्हटलं आहे. ही काँग्रेसची 1990 नंतरची सर्वात वाईट कामगिरी मानली जात आहे. 1990 मध्ये काँग्रेसला 33 जागांवर विजय मिळाला होता.  


2002 नंतर प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागांमध्ये वाढ, मात्र यावेळी मोठी घट 


गुजरात दंगलीनंतर 2002 मध्ये गुजरातमध्ये निवडणुका झाल्या होत्या. ज्यामध्ये काँग्रेसला 51 जागांवर विजय मिळाला होता. काँग्रेसविरुद्ध भाजपला 127 जागा मिळाल्या होत्या. 2007 च्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेत येऊ शकली नाही, पण पक्षाच्या 8 जागा वाढल्या होत्या. दरम्यान, 2007 मध्ये भाजपनं 117 जागा जिंकल्या होत्या आणि काँग्रेसनं 59 जागा जिंकल्या होत्या.


2012 च्या निवडणुकीच्या वेळी, तत्कालीन मनमोहन सिंह सरकारच्या विरोधात देशभरात निदर्शनं सुरू होती. जी भाजपनं गुजरातमध्येही सुरु ठेवली होती, असं असतानाही काँग्रेसनं गुजरातमध्ये चांगली कामगिरी करत 61 जागा जिंकल्या होत्या. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसनं सत्ताधारी भाजपला कडवी टक्कर दिली होती.


1990 नंतरची सर्वोत्तम कामगिरी दाखवत काँग्रेसनं या निवडणुकीत 77 जागा जिंकल्या होत्या. 20 हून अधिक जागांवर पक्षाच्या उमेदवारांचा अल्प फरकानं पराभव झाला होता.