मुंबई: गुजरातमध्ये (Gujarat election result 2022) तब्बल सातव्यांदा भाजपने (BJP) बाजी मारली असून जवळपास 157 जागांवर भाजपने विजय मिळवला आहे. भाजपचा विजय हा ऐतिहासिक असा आहे. येत्या 12 डिसेंबरला गुजरातमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार असून भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) हेच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. 


गुजरातमध्ये 12 डिसेंबर रोजी होणाऱ्या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. भाजपला मिळालेल्या या ऐतिहासिक यशाचा जल्लोष मोठ्या प्रमाणावर केला जाणार असल्याची माहिती आहे. भूपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांच्या शपथविधीचा मेगा शो करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी 6 वाजता दिल्लीतील भाजप कार्यालयात जाणार आहेत. 


Gujarat election result 2022: आपला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार


आपने (AAP) ज्या पद्धतीनं गुजरातमध्ये जागा निवडून येण्याचा दावा केला होता तेवढं मोठं यश आपला पदरात पाडून घेता आलं नाही. आपची जागांची आकडेवारी हाताच्या बोटांवर मोजण्याएवढीच राहिली. मात्र असं असलं तरी आपनं गुजरातमध्ये 13 टक्क्यांपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. त्यामुळे आपचा राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय.


आपच्या मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार पराभूत 


'आप'च्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इशुदान गढवी यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. खंबालियामधून इशुदान गढवी पराभूत झाले आहेत. खंबालियामध्ये भाजपचे मुलुभाई बेडा विजयी झाले आहेत. 


काँग्रेसची दाणादाण, विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही


या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये काँग्रेसची (Congress) मात्र पुरती दाणादाण उडाली आहे. सकाळपासून भाजपच्या विजयाचे संकेत मिळायला लागल्यानंतर गुजरातमधील काँग्रेस कार्यालयात अक्षरशः शुकशुकाट दिसून आला. गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसनं 179 जागांवर उमेदवार दिले होते. पण काँग्रेसला दोन आकडी संख्याही अगदी जेमतेमच गाठता आली आहे. काँग्रेसच्या अनेक दिग्गजांना आज पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. मात्र एवढ्या दारूण पराभवामुळे आता काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नसल्याचं स्पष्ट झालंय. आपमुळे काँग्रेसची मतं विभाजित झाल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलयं.


ही बातमी वाचा: