Gujarat Elections 2022 : गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी (Gujarat Elections) आज पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी भाजपचे (BJP) उमेदवार पियुष पटेल (Piyush Patel) यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती समोर येतेय. ते वांसदा येथील प्रतापनगर येथून वंडरवेला येथे जात होते. वांसदा येथील झरी गावात अज्ञात लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पटेल यांच्या गाडीची विंडशील्ड तुटली, तसेच त्यांच्या डोक्याला दुखापतही झाली.



भाजपकडून काँग्रेसवर हल्ल्याचा आरोप
मतदानापूर्वी भाजप उमेदवारावर हल्ला झाल्याने पक्षाचे उमेदवार व समर्थक संतप्त झाले आहेत. पियुष पटेल यांच्यावर हल्ल्यानंतर वांसदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचा आरोप त्यांनी काँग्रेस उमेदवार अनंत पटेल यांच्या समर्थकांवर केला आहे. मतदानापूर्वी काँग्रेसने नियोजन करून हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. पीयूष पटेल यांच्यासोबत उपस्थित असलेले 4 ते 5 कर्मचारीही जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याशिवाय ताफ्यातील 3-4 वाहनांचेही नुकसान झाले आहे.  


भाजप समर्थकांचा गोंधळ


मतदानापूर्वी भाजप पक्षाच्या उमेदवारावर हल्ला झाल्याचे वृत्त समजताच समर्थकांनी एकच गोंधळ सुरू केला. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विरोधात घोषणाबाजी केली. मिळालेल्या माहितीनुसार, पियुष पटेल त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह कारमध्ये बसले होते. त्यांना वंडरवेल या ठिकाणी जायचे होते. त्याचवेळी झरी गावात अज्ञात लोकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला, त्यात ते जखमी झाले. त्यांच्या गाडीची विंडशील्डही तुटली. फोटोंमध्ये त्याच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसत आहे. 


वांसदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 
याप्रकरणी वांसदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर मतदान होत आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतदान सुरू होणार असून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 39 पक्षांचे 788 उमेदवार नशीब अजमावत आहेत. 


दोन टप्प्यात मतदान 
गुजरातमध्ये मतदान दोन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यांत 89 जागांवर मतदान होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यांत 93 जागांसाठी मतदान (Voting) पार पडणार आहे. 1 आणि 5 डिसेंबर रोजी गुजरात विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, हिमाचल प्रदेश आणि गुजरात विधानसभा निवडणुकांचा निकाल एकाच दिवशी म्हणजेच, 8 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. दरम्यान, भाजपसाठी दोन्ही विधानसभा निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत. 


 


इतर महत्वाच्या बातम्या


Gujrat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेचं आज पहिल्या टप्प्यातील मतदान; 89 जागांसाठी 788 उमेदवार मैदानात