मुंबई : शिवसेना-भाजपच्या जागावाटपाच्या चर्चेत शिवसेनेला अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता, असं दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. महायुतीचं सरकार आम्ही स्थापन करु असा मला पूर्ण विश्वास आहे. तसेच भाजपच्या नेतृत्वातच सरकार स्थापन होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑफ द क‍ॅमेरा म्हटलं आहे. उद्या भाजपच्या बैठकीत विधिमंडळ नेता निवडला जाईल. गेल्या 30 वर्षात सर्वात चांगला स्ट्राईक रेट भाजपचा आहे.


फर्स्ट मेरिट पेक्षा आम्ही फर्स्ट क्लास फर्स्ट पास झालो याचं समाधान आहे. प्लान बी कुठलाही नाही, प्लॅन ए तयार आहे, तोच यशस्वी ठरणार आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आतापर्यंत 10 अपक्ष आमदारांचं समर्थन भाजपला मिळालं आहे. 15 अपक्ष आमदार आम्हाला समर्थन करतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.


मुख्यमंत्री पदाबाबत शब्द दिला नव्हता


भाजप अध्यक्ष अमित शाह उद्याच्या बैठकीला येणार नाहीत. अधिकृत आणि अनधिकृत बैठका सुरु आहेत. अडीच-अडीच वर्षांचं मुख्यमंत्रीपद हा शब्द वाटाघाटीत शिवसेनेला कधीच दिला नव्हता. चर्चेला बसल्यानंतर शिवसेनेची काय मागणी आहे, त्यावर चर्चा होईल. मेरिटवर मागण्या मान्य करु अगदीच आडमुठी भूमिका आम्ही घेणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. आदित्य ठाकरे यांना काय करायचं हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मुख्यमंत्रीपदाबाबत त्यांच्याकडून मागणी झाली होती, मात्र मुख्यमंत्री पदाबाबत कुठलाच शब्द दिलेला नाही हे अमित शाह यांनी मला स्पष्ट केलं आहे.



सामनातील लिखाणाबाबत 100 टक्के नाराज


शिवसेनेचं मुखपत्र सामनातून गेल्या काही दिवसांपासून सातत्याने भाजपविरोधात लिहिलं जात आहे. त्यावरही मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली. सामनामध्ये जे लिहलं जातं याबाबत आमची 100 टक्के नाराजी आहे. आम्ही सोबत आहोत तर असं लिहण्याची गरज नाही. एवढ्या ताकदीने कधी काँग्रेस-राष्ट्रवादी विरोधात ही लिहून दाखवावे, असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी दिलं.


पावसात भिजावं लागतं, आमचा अनुभव कमी पडला


निवडणूक प्रचारादरम्यान शरद पवार यांनी साताऱ्यात पावसात केलेलं भाषण प्रचंड गाजलं होतं. शरद पवारांच्या त्याच भाषणाचा मोठा फायदा काँग्रेस-राष्ट्रवादीला झाल्याचं जाणकारांचं मत आहे. याबाबत बोलताना, पावसात भिजावं लागतं आणि पावसात भिजल्याने फायदा होतो याबाबत आमचा अनुभव कमी पडला, असा टोला मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना लगावला.



शिवसेनेचे काही नेते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात असल्याचं मोठं विधान भाजप सहयोगी खासदार संजय काकडे यांनी केलं होतं. त्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेनेचे आमदार आमच्या संपर्कात आहेत असं काकडे म्हणाले हे मला माहित नाही. खरंतर काकडेच माझ्या संपर्कात नाहीत, अशारीतीने मुख्यमंत्र्यांनी काकडेंचा दावा खोडून काढला आहे.


VIDEO | वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम



संबंधित बातम्या