गोवा : गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान झाले. यामध्ये 8 हजार 119 पुरुष तर 8,799 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीसाठी एकूण 16 हजार 918 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.


115 दिव्यांगांपैकी 101 लोकांनी मतदान केले.  सर्वाधिक मतदान 16 नंबर मतदान केंद्रावर 89.86% तर सर्वात कमी मतदान 15 नंबर मतदान केंद्रावर  63.96 टक्के झाले असल्याची माहिती माहिती निवडणूक आयोग कार्यालयाने दिली आहे.

पणजी पोटनिवडणुकीसाठी आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदान केंद्र 9 वर मतदान केले. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी जुंता हाउस मधील 21 नंबरच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले.

आपचे वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांचे मतदान पणजी मतदारसंघात नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.

मतदान केंद्र 9 वरील व्हीव्हीपॅट मशीन मध्ये बिघाड झाल्यामुळे जवळपास 20 मिनिटे मतदान थांबवावे लागले होते.त्यानंतर मशीन बदलून मतदान प्रक्रिया पूर्ववत सुरु करण्यात आली. सकाळच्या सत्रात तरुणांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिक मतदानासाठी बाहेर पडलेले दिसून आले. 15 नंबर मतदान केंद्रावर 102 वर्षाच्या मारिया नावाच्या महिलेने मतदानाचा हक्क बजावला.
अटीतटीच्या लढतीमुळे राज्याबरोबर देशाचे लक्ष पणजी पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसकडून बाबूश मोन्सेरात, गोवा सुरक्षा मंचतर्फे सुभाष वेलिंगकर, आपकडून वाल्मिकी नाईक यांच्या सह दोन अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात असली तरी आपचे वाल्मिकी नाईक आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर किती मते मिळवणार यावर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे. या निवडणुकीचा निकालदेखील लोकसभेच्या निकालादिवशी 23 मे रोजी लागणार आहे.