पणजी : पणजीऐवजी बिचोलीतून उमेदवारी घ्यावी हा भाजपचा प्रस्ताव उत्पल पर्रिकर यांनी नाकारला असून आता ते पणजीतून अपक्ष लढणार आहेत. तशा प्रकारची घोषणा त्यांनी केली. उत्पल पर्रिकरांचा हा निर्णय भाजपसाठी मोठा धक्का असल्याचं सांगण्यात येतंय. उत्पल पर्रिकर हे भाजपचे दिवंगत नेते मनोहर पर्रिकर यांचे पुत्र आहेत.
गोव्यासाठी भाजपकडून 34 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या या यादीत पणजीतून उत्पल पर्रिकर यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे. त्याऐवजी त्यांना बिचोलीतून निवडणूक लढवण्याचा पर्याय देण्यात आला होता. त्यामुळे उत्पल पर्रिकरांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला.
माझी भूमिका ठाम आहे, मी पणजीतूनच लढणार. दुसऱ्या जागेवरुन लढण्याचा कुठलाही विचार नाही अशी भूमिका उत्पल पर्रिकरांनी या आधीच मांडली होती.
पणजी गोव्याच्या राजकारणात कायम केंद्रस्थानी देखील राहिली आहे. गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांचा हा मतदारसंघ. पण या मतदारसंघातून भाजपने उत्पल पर्रिकरांना डावलून बाबूश मोन्सेरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बाबूश मोन्सेरात यांचे तिसवाडी तालुक्यातील तालीगांव, साताक्रुझ, सातआंद्रे या ठिकाणी समर्थक आमदार आहेत. शिवाय, मोठ्या संख्येनं असलेल्या कॅथलिक मतदारांचा असलेला पाठिंबा ही देखील त्यांच्या जमेची बाजू. केवळ पक्षनेत्यांची मुलं आहेत म्हणून उमेदवारी देण्याची भाजपमध्ये पद्धत नाही, असं भाजपचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं.
दरम्यान, उत्पल पर्रिकरांनी पणजीतून उमेदवारी अर्ज भरला तर शिवसेनेचे उमेदवार शैलेंद्र वेलिंगकर आपली उमेदवारी मागे घेतील आणि शिवसेना उत्पल पर्रिकरांच्या मागे राहिल असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या :
- गोव्यासाठी शिवसेनेचे उमेदवार जाहीर, आदित्य ठाकरे प्रचारासाठी मैदानात उतरणार : संजय राऊत
- BJP Candidates List : गोव्यासाठी भाजपची 34 उमेदवारांची यादी, उत्पल पर्रिकरांना पणजीतून उमेदवारी नाकारली
- सध्या गोव्याची सत्ता गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांच्या हातात : संजय राऊत