मुंबई : एकीकडे कॉंग्रेस पक्षातील विद्यमान आमदार, नेते पक्ष सोडून जात असताना राज्यातील माजी मंत्री, खासदारांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी दिल्लीतील वरिष्ठांनी सूचना केल्याची माहिती आहे. मात्र राज्यातील नेते मात्र या वृत्ताला नकार देत आहेत.

सध्या महाराष्ट्रात काँग्रेसला गळती लागली आहे. 2019 विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक विद्यमान आमदारांनी, बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे माजी खासदार, माजी मंत्र्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी सूचना हायकमांडने केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

अशोक चव्हाण हे पहिल्यापासून विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक होते, हायकमांडच्या आदेशामुळे त्यांना लोकसभा निवडणूक लढवावी लागली होती. आता ते विधानसभा निवडणूक लढवणार आहेत.

कॉंग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे, राजीव सातव, संजय निरुपम, मिलिंद देवरा यांना याबाबत विचारले असता त्यांनी हे वृत्त फेटाळले आहे. पक्षाने असं काहीही विचारले नसल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले आहे.

राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळीच स्पष्ट केलं होतं की त्यांना संघटनात्मक काम करण्यात रस आहे. सुशीलकुमार शिंदे 2004 पासून संसदेत प्रतिनिधित्व करत आहेत. केंद्राच्या राजकारणात ते तेव्हापासून सक्रिय होते. त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे निवडणूक लढवणार आहेत.

2014 लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी हा प्रयोग केला होता. राज्यातील प्रमुख मंत्र्यांना लोकसभा निवडणूक लढवण्यास सांगितले होते. पण त्यात त्यांचा पराभव झाला होता. आता काँग्रेसकडे अनुभवी उमेदवारांची वानवा असताना माजी खासदार, नेते पण विधानसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक दिसत नसल्याचे चित्र आहे.