मुंबई : सोशल मीडियावरील डिजिटल महायुद्धात भाजपने विरोधकांवर कायम कुरघोडी मिळवली आहे. खरं तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याच्या आधीपासूनच भाजपने सोशल जगतात वर्चस्व मिळवलं आहे. मात्र बुधवारी भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया टीम्सनी मोदी सरकारला घरचा आहेर देणारे ट्वीट्स केले आणि

अर्थ आणि शिपिंग मंत्रालयाचे राज्यमंत्री पॉन राधाकृष्णन यांच्या ट्विटर अकाऊण्टवरुन मोदी सरकारवर ताशेरे ओढणारं ट्वीट आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. 'मोदींनी सर्वसमावेशक विकासावर भर दिलेला नाही. हा नवीन भारत आहे, जिथे प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार केला जात नाही.' अशा आशयाचं हे ट्वीट होतं.

आसाम भाजपच्या ट्विटर अकाऊण्टवरुनही अशाच पद्धतीचं मोदी सरकारवर टीका करणारं ट्वीट करण्यात आलं. मोदी सरकारच्या नेतृत्वातील नवीन भारतात प्रामाणिकपणाचा अभाव आहे, अशी टीका करण्यात आली होती. हे दोन्ही ट्वीट डिलीट होण्यापूर्वीच त्याचे स्क्रीनशॉट वायरल झाले.

दोन्ही ट्विटर अकाऊण्ट हॅक झाल्याची शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात आली होती. मात्र हा प्रकार वेगळाच होता. 'अल्ट न्यूज'च्या प्रतीक सिन्हा यांनी एक व्हिडिओ ट्वीट करुन यामागील धक्कादायक वास्तव समोर आणलं आहे.

भाजपच्या आयटी तज्ज्ञांनी सोशल मीडिया टीम्सना पुरवलेलं पब्लिक गुगल डॉक्युमेंट काही जणांनी एडिट केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही डॉक्युमेंट्स ऑनलाईन एडिट करता येतात. मोदी सरकारविषयीच्या सकारात्मक बाबी कशाप्रकारे नकारात्मक बाबींमध्ये बदलता येतात, याचं लाईव्ह एडिटिंग व्हिडिओमध्ये दिसत आहे.

संबंधित भाजप नेत्यांच्या सोशल मीडिया टीम्स स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आहेत. त्यांनी मिळालेल्या डॉक्युमेंट्समधील मजकूर 'बिनडोकपणे' ट्वीट केले.

'ही गोष्ट हास्यास्पद वाटत असली, तरी भाजपच्या कार्यालयात बसलेली अशासकीय व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांनी काय ट्वीट करावं यावर नियंत्रण ठेवत आहे, याकडे लक्ष वेधण्याचा उद्देश आहे' असं प्रतीक सिन्हांनी ट्वीट करताना सांगितलं. त्यामुळे सोशल वॉरमध्ये विरोधक एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी कुठलं अस्त्र वापरतील, हे सांगता येत नाही.