मुंबई: देशातील लोकसभा निवडणुकीचे सातव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान शनिवारी संपुष्टात आले. यानंतर विविध माध्यम संस्थांकडून लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll 2024) जाहीर करण्यात आले. लोकसभा निवडणुकी राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीपैकी कोण बाजी मारणार, याची सर्वांना उत्सुकता आहे. मात्र, त्यासोबतच ठाकरेंचा बालेलिकल्ला असणाऱ्या मुंबईत (Mumbai Lok Sabha) काय घडणार, याची उत्सुकता सर्वांना होती. शिवसेनेचा (Shivsena) पसारा राज्यभरात असला तरी मुंबई हा ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेची निर्विवाद सत्ता आहे. मात्र, एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडून भाजपसोबत गेल्यानंतर मुंबईतील चित्र बदलेल, अशी चर्चा होती. एकनाथ शिंदेंच्या जाण्याने ठाकरे गट खिळखिळा झाला, असेही सांगितले जात होते. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या उद्धव ठाकरे आणि सामान्य शिवसैनिकांनी झोकून देऊन प्रचार केला होता. याचा परिणाम एक्झिट पोलच्या निकालात दिसून येत आहे. 


टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, मुंबईत ठाकरे गटाला चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. या एक्झिट पोलमध्ये मुंबईतील पाच लोकसभा मतदारसंघांतील निकालाच अंदाज वर्तविण्यात आला आहे. यामध्ये वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर यांचा विजय होण्याची शक्यता आहे. त्यांच्याविरोधात शिंदे गटाचे रवींद्र वायकर रिंगणात होते. तर गेल्या काही वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणारा ईशान्य मुंबई मतदारसंघही धोक्यात दिसत आहे. ईशान्य मुंबईत भाजपचे मिहीर कोटेचा आणि ठाकरे गटाचे संजय दिना पाटील यांच्यात लढत होती. ईशान्य मुंबईतील गुजराती व्होटबँक भाजपचा हक्काचा मतदारसंघ समजला जातो. त्यामुळे मिहीर कोटेचा यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, एक्झिट पोलच्या अंदाजानुसार ईशान्य मुंबईत संजय दिना पाटील बाजी मारू शकतात. तर दक्षिण मुंबईत ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचे पारडे भारी ठरण्याची शक्यता आहे. त्यांच्यासमोर शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचे आव्हान होते.


याशिवाय, उत्तर मध्य मुंबईत काँग्रेस पक्षाच्या वर्षा गायकवाड विरुद्ध भाजपचे उज्वल निकम असा सामना होता. या ठिकाणी वर्षा गायकवाड बाजी मारण्याचा अंदाज एक्झिट पोल्समधून वर्तवण्यात आला आहे. तर मुंबईतील एकमेव मतदारसंघात शिंदे गटाची सरशी होताना दिसत आहे. दक्षिण मध्य मुंबईत शिंदे गटाचे राहुल शेवाळे आणि ठाकरे गटाचे अनिल देसाई यांच्यातील लढाईत शेवाळे यांची सरशी होण्याची शक्यता आहे. तर भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या उत्तर मुंबईत पीयूष गोयल यांची बाजू भक्कम आहे. मात्र, या मतदारसंघाबाबतची एक्झिट पोलची आकडेवारी अद्याप समजू शकलेली नाही. 


एबीपी सी वोटर एक्झिट पोल


महायुती


भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1 


महाविकास आघाडी


ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1


एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12


TV9 एक्झिट पोलचा निकाल


भाजप : 19
शिंदे गट : 4
अजित पवार गट : 0
ठाकरे गट : 14
काँग्रेस : 5
शरद पवार गट : 6


आणखी वाचा


महाराष्ट्रात मविआ 23, महायुती 24, ठाकरेंना 9, अजित पवारांना एका जागेचा अंदाज