बीड: लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलचे निकाल समोर आल्यानंतर बीड लोकसभेतील शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनावणे (Bajrang Sonawane) यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डिवचले. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या बीड लोकसभेत माझ्यासमोर कोणी उमेदवार आहे का?, अशी प्रौढी मिरवत होत्या. मात्र, पंकजा मुंडे यांना आता कळालं असेल मी कसा उमेदवार होतो. बीड लोकसभेची (Beed Lok Sabha) निवडणूक एकतर्फी झाली असून माझा विजय 100 टक्के निश्चित आहे, असा दावा बजरंग सोनावणे यांनी केला.
एक्झिट पोल्सच्या आकडेवारीनुसार देशात एनडीएला मोठे यश मिळताना दिसत असले तरी महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे. परंतु, 'टीव्ही 9 पोलस्ट्राट आणि पीपल्स इनसाईट्स'च्या एक्झिट पोलनुसार बीड लोकसभा मतदारसंघात भाजपच्या पंकजा मुंडे यांची सरशी होताना दिसत आहे. त्यामुळे बजरंग सोनावणे यांचा पराभव होऊ शकतो, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तविण्यात आला होता. मात्र, बजरंग सोनावणे यांना आपल्या विजयाबद्दल पूर्णपणे खात्री आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाचा सर्वाधिक प्रभाव मराठवाड्यात दिसून आला होता. या आंदोलनाच्या काळात बीडमध्ये मराठा आंदोलकांना जाळपोळ केली होती. यानंतरच्या देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या भूमिकेवर मराठा समाज नाराज असल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महायुतीला फटका बसेल, असा अंदाज होता. बीडमध्ये पंकजा मुंडे आणि जालन्यात रावसाहेब दानवे यांना मराठा समाजाच्या नाराजीमुळे पराभवाचा फटका बसू शकतो, अशी जोरदार चर्चा होती. त्यामुळे आता 4 जूनला या दोन मतदारसंघांमध्ये काय निकाल लागणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली आहे.
मला मनोज जरांगेंच्या फायदा झाला: बजरंग सोनावणे
ही निवडणूक वन साईड झाली आणि मी 100% निवडून येणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा मला फायदा झाला.
बीड जिल्ह्यातील ही निवडणूक विकासावरच गेली जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो मूड महाविकास आघाडीच्या बाजूने तोच बीड जिल्ह्यातही आहे. एक्झिट पोलचे सर्व्हे कसे करतात काय करतात मला माहित नाही. पण मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे. असे बजरंग सोनावणे यांनी सांगितले.
मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या मराठा आरक्षणाचा फायदा जरी मला झाला असला तरी मला सगळ्या समाजाने मतदान केले. मनोज जरांगे पाटील यांनी कुणाला विरोध करण्याची भूमिका घेतली नाही.
मी या निवडणुकीत कोणत्याही नेत्याविरोधात वैयक्तिक आरोप केले नाहीत. पण माझ्यावर जे वैयक्तिक आरोप झाले, त्याला मला उत्तर द्यावं लागेल. वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप ऐकायला बरे वाटतात. त्यामुळे कुणालाही मते पडतात, असे अजिबात नाही. मी या निवडणुकीत उमेदवारी घेतल्यानंतर होणाऱ्या परिणामाचा विचार केला नाही. यापूर्वी सुद्धा माझ्यावर काय परिणाम झाला हे सगळ्यांना माहिती आहे. फक्त हे परिणाम अगदी घराच्या चुलीपर्यंत येऊ नयेत, एवढीच माझी अपेक्षा आहे, असे सोनावणे यांनी म्हटले.
आणखी वाचा
कोण होणार बीडचा खासदार? अटीतटीच्या संघर्षात भाजपाचे कमळ फुलणार की राष्ट्रवादीची तुतारी वाजणार?