नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीर भारतीय जनता पक्षाच्या तिकीटावर दिल्लीतून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. गंभीर नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे, अशी माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात क्रिकेटमधून गंभीरने निवृती घेतली होती. आता तो राजकीय इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत आहे. यापूर्वी त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. तसेच तो वारंवार केजरीवाल यांच्यावर निशाणा साधत आहे. तेंव्हापासून गंभीर राजकारणात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे.
गंभीर दिल्लीच्या सुरेंद्र नगरमध्ये राहतो, हा भाग नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे गंभीरला या मतदारसंघातून उतरवण्याची तयारी भाजपने सुरु केली आहे. शिवाय गंभीरचा स्टारप्रचारक म्हणूनही भाजपला फायदा होईल. सध्या भाजपच्या मिनाक्षी लेखी नवी दिल्ली मतदारसंघाच्या खासदार आहेत. एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांच्या सर्व्हेत भाजपला दिल्लीतील सातही लोकसभा मतदारसंघात विजय मिळेल, अशी शक्यता वर्तवली आहे.
गंभीर आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली या दोघांचे जवळचे संबंध आहेत. गंभीर दिल्लीच्या संघाचा कर्णधार होता, तेव्हा अरुण जेटली दिल्ली क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष होते. गंभीर हा जेटलींचा आवडता खेळाडूदेखील आहे.
गौतम गंभीर भारतीय संघाकडून 15 वर्ष क्रिकेट खेळला आहे. त्याने त्याच्या कारकिर्दीत 58 कसोटी आणि 147 एकदिवसीय सामने खेळला आहे. एकदिवसीय सामन्यात त्याने 5238 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 11 शतक लगावले आहेत. तर कसोटी सामन्यात नऊ शतक लगावत 4154 धावा केलेत. क्रिकेटच्या मैदानात धमाकेदार कारकीर्द गाजवणारा गंभीर राजकीय मैदानात उतरुण तशीच धमाकेदार सुरुवात करेन का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
गौतम गंभीर भाजपच्या तिकीटावर या मतदारसंघातून लढवणार निवडणूक?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
13 Mar 2019 08:40 AM (IST)
मागील वर्षी डिसेंबर महिन्यात क्रिकेटमधून गंभीरने निवृती घेतली होती. आता तो राजकीय इनिंग सुरु करण्याच्या तयारीत आहे. मागील काही दिवसांपासून तो दिल्लीच्या राजकारणावर भाष्य करताना दिसत आहे. यापूर्वी त्याने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -