महापालिका निवडणूक : अहमदनगरमध्ये मतदानाला सुरुवात, शिवसेना कार्यकर्त्यावर हल्ल्याने तणाव
एबीपी माझा वेब टीम | 09 Dec 2018 08:06 AM (IST)
सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्याकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.
अहमदनगर : राज्यभराचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे गालबोट लागले आहे. त्यामुळे शहरात कडेकोट बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरु आहे. अहमदनगर महापालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला शिवसेना कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे. सागर थोरात असं या शिवसेना कार्यकर्त्याचं नाव आहे. वॉर्ड क्रमांक 12 मधील सागरवर धारदार शस्त्रानं हल्ला करण्यात आला. हल्ल्यात सागर गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, हा हल्ला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. मात्र या प्रकरणामागे भाजपचा काहीही संबंध नसल्याचा खुलासा भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी केलाय. भारतीय जनता पार्टीला जनता निवडून देणार असल्याने शिवसेनेच्या पायाखालची जमीन घसरल्याने शिवसेना असे आरोप करत असल्याचे भाजपने स्पष्ट केले आहे. ऐन निवडणुकीच्या मतदानाआधी ही घटना घडल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.