मुंबई : मतदान केल्यानंतर अनेकांनी त्यांच्या बोटावरची शाई पुसली जात असल्याची तक्रार केली. त्यावर स्पष्टीकरण देण्यासाठी अखेर निवडणूक आयोगाला माध्यमांसमोर यावं लागलं. बोटावर लावण्यात आलेली शाई पुसण्याचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणं हे गैरकृत्य असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं. त्याचबरोबर बोटावरची शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदान करण्यासाठी आल्याचं आढळल्यास त्यावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही केली जाईल असंही निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं.
मतदान करुन आलेल्या काही नागरिकांच्या बोटावरील शाई पुसली जात दावा केला जात आहे. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे दुबार मतदान होण्याची शक्यता वर्तवली गेली. यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील शाई प्रकरणावरुन हल्लाबोल केला.
शाई पुसू नये, आयोगाचं आवाहन
बोटावरील शाई पुसली जात असल्याचे आरोप झाल्यानंतर राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, राज्य निवडणूक आयोगानं 19 आणि 28 नोव्हेंबर 2011 याविषयी आदेश काढला होता. तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मतदाराच्या बोटाला शाई लावण्यासाठी मार्करचा वापर केला जात आहे. या आदेशानुसार मतदाराच्या बोटावर ठळकपणे उमटेल अशा पद्धतीनं, तसंच नखावर आणि नखाच्या वरच्या बाजुला त्वचेवर तीन- चार वेळा घासून शाई लावावी, अशा सूचना यापूर्वीदेखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही शाई पुसण्याचा प्रयत्न करण्याचं गैरकृत्य करू नये.
शाई पुसल्यास कारवाई करणार
बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा व्हिडीओंवर कारवाई करण्यात येईल असं दिनेश वाघमारे म्हणाले. बोटावरची शाई जाते की नाही याची निवडणूक आयोगाने खात्री केली. आयोगाच्या कर्मचाऱ्याच्या बोटावर शाई लावून ती जाते की नाही याची खातरजमा केली, ती शाई गेली नाही अशी माहिती दिनेश वाघमारे यांनी दिली.
बोटावरची शाई पुसली जात असल्याचा दावा करणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अशा व्हिडीओंवर कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला.
बोगस मतदानावर कारवाई केली
निवडणूक आयोग कुणाचीही बाजू घेत नाही. सर्व चुकीच्या गोष्टी या निवडणूक आयोगावर ढकलल्या जात आहेत. मतदारांचीही काही जबाबदारी आहे, आधी त्यांनी त्यांच्या नावाची खातरजमा करायला हवी होती असं निवडणूक आयोगाने म्हटलं.
ज्या ठिकाणी बोगस मतदान झालं आहे त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत आमच्याकडे एक तक्रार आली आहे, त्यावर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली.
पाडू यंत्राबाबत विरोधी पक्षांनी केलेल्या आरोपांवर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं. पाडू हे यंत्र 2004 पासून वापरात आहे, ते नवीन नाही. ते अपवादात्मक परिस्थितीत. ईव्हीएम डिस्प्ले बंद पडल्यास वापरण्यात येतं. आतापर्यंत 0.5 टक्के वेळाच हे यंत्र वापरण्यात आलं आहे असं निवडणूक आयोगाने म्हटलं.
ही बातमी वाचा: