नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित 'पीएम नरेंद्र मोदी' सिनेमानंतर आता निवडणूक आयोगाने नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित बेव सीरिजवरचंही प्रदर्शन थांबवलं आहे. निवडणूक आयोगाने 'मोदी जर्नी ऑफ कॉमन मॅन' या वेब सीरिजचं स्ट्रीमिंग थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
निवडणूक आयोगाने या वेब सीरिजचे सर्व एपिसोड्सचं स्ट्रीमिंग सर्व ऑनलाईन माध्यामावर बंद करण्याचे आदेश इरॉस नाऊला दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित या वेब सीरिजचे पाच एपिसोड स्ट्रीम झाले आहेत.
आम्ही गेल्या 11 महिन्यांपासून या वेब सीरिजवर काम करत आहोत. मात्र तांत्रिक अडचणींमुळे ही वेब सीरिज स्ट्रीम होण्यास वेळ लागला. निवडणुकीच्या काळात ही वेब सीरिज स्ट्रीम करण्याचा आमचा कोणताही हेतू नव्हता, असं स्पष्टीकरण दिग्दशक उमेश शुक्ला यांनी दिलं आहे.
'मोदी जर्नी ऑफ कॉमन मॅन' ही वेब सीरिज मिहीर भूटा यांनी लिहिली आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनक्रम तीन टप्प्यात दाखवण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. यामध्ये फैजल खान, आशिष शर्मा आणि महेश ठाकून यांनी भूमिका निभावली आहे.
'पीएम नरेंद्र मोदी' चित्रपटाचं प्रदर्शनही रोखलं
पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट 29 मार्च रोजी प्रदर्शित केला जाणार होता. परंतु सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आलं. त्यानंतर चित्रपट 5 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर हा चित्रपट मतदानाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 11 एप्रिल रोजी प्रदर्शित करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा चित्रपट निवडणूक काळात प्रदर्शित केला जाऊ नये यासाठी विरोधी पक्षाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने याबाबतचा निर्णय निवडणूक आयोगाने घ्यावा, असे म्हणत जबाबदारी निवडणूक आयोगावर सोपवली. त्यानंतर निवडणूक काळात चित्रपट प्रदर्शित झाल्यास आचारसंहितेचा भंग होईल, असे मत मांडत निवडणूक आयोगानं 'पीएम नरेंद्र मोदी' या चित्रपट प्रदर्शित केला जाऊ नये, असा निर्णय घेतला.