सातारा जिल्ह्यातील कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील नवलेवाडी गावातील मतदान केंद्रात हा प्रकार घडल्याचा दावा करण्यात आला होता. मत देण्यासाठी घडाळाच्या समोरील बटण दाबल्यानंतर कमळाला मत जात असल्याचं एका मतदाराच्या लक्षात आल्याचा दावा त्याने केला. हा प्रकार मतदान केंद्राधिकाऱ्याच्या लक्षात आणून दिल्यानंतर त्याला रितसर तक्रार देण्याची विनंती करण्यात आली. मात्र त्याने तक्रार न देता प्रसारमाध्यमांना माहिती दिली. प्रसार माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियात याविषयीच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सर्व प्रकाराची छानणी केल्यानंतर संबंधित मतदाराच्या दाव्यात तथ्य नसल्याचं स्पष्ट झालं.
मतदानाच्या दिवशी म्हणजे काल 21 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेपाच वाजता संबंधित मतदान केंद्रावर सर्व प्रमुख उमेदवारांच्या प्रतिनिधींना ईव्हीएम व्यवस्थित काम करत असल्याची शहानिशा करायला सांगण्यात आलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दिलीप वाघ आणि दीपक पवार हे अभिरुप मतदानाच्या वेळी उपस्थित होते. त्यावेळी सर्व मतदान यंत्रे व्यवस्थित कार्यरत आहेत. त्यामध्ये कोणताही दोष नाही याची खातरजमा त्यांनी केली होती. फक्त ईव्हीएमवरील राजकीय पक्षांच्या चिन्हांप्रमाणेच व्हीव्हीपॅटमधील प्रिंटही योग्य त्या उमेदवाराच्या मताचीच होत असल्याचीही खात्री करण्यात आली होती.
दुपारी नवलेवाडीच्या त्या मतदाराने घडाळ्याचं बटन दाबल्यानंतर कमळाला मत जात असल्याचा आरोप केल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधी दीपक पवार यांनीही दुपारी ईव्हीएमला आक्षेप घेतला. त्यावेळी त्यांना तक्रारीसाठी आवश्यक विहित 15 क्रमांकाच्या जोडपत्रात अर्ज भरून देण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी त्यांनी त्यास नकार दिला. त्यानंतरही या मतदान केंद्रावर सायंकाळपर्यंत मतदान व्यवस्थित सुरु होतं. कुणाही मतदाराची कसलीही तक्रार आली नाही, असं निवडणूक आयोगाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकारी कीर्ती नलावडे यांनी स्पष्ट केलं आहे.