Eknath Shinde Daregaon: काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Daregaon) आज मुंबईत परतणार असल्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे साताऱ्यातील दरे गावात मुक्कामी होते. परंतु ते आजारी पडल्याने डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. त्यानुसार त्यांनी काल विश्रांती घेतली आणि त्यांची तब्येत काही प्रमाणात बरी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. त्यामुळे आज दुपारी ते मुंबईला परतण्याची शक्यता आहे. दरम्यान, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी येत होते. परंतु आजारी असल्यामुळे एकनाथ शिंदेंनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. 


एकनाथ शिंदे हे सध्या आपल्या साताऱ्यातील मूळ गावी आले आहेत. सत्ता स्थापनेच्या धावपळीतच ते गावी आल्याने अनेक चर्चांना उधाण आलं होतं. मात्र गावी आल्यानंतर एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर आली. त्यामुळे काल दिवसभर एकनाथ शिंदे यांनी आराम केला. त्यानंतर आज एकनाथ शिंदे ठाण्याला परतणार आहेत. एकनाथ शिंदे दुपारी दरेगावातून हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती मिळत आहे. एकनाथ शिंदे ठाण्यात दाखल झाल्यानंतर ते विविध बैठकीत सहभागी होणार की नाही आणि महायुतीकडून पुढे कोणती पावलं उचलली जाणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.


एकनाथ शिंदेंना ताप-


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ताप आहे. घशाला इन्फेकशन आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, त्यांना सलाइन लावण्यात आल्याची माहिती त्यांचे फॅमिली डॉक्टर आर. एम. पार्टे यांनी दिली. एकनाथ शिंदे यांच्यावर चार जणांचे डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली होती. 


दीपक केसरकर माघारी गेले...


शिंदे गटाचे नेते माजी मंत्री दीपक केसरकर आणि जळगाव पाचोड्याचे आमदार कपिल पाटील हे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला काल त्यांच्या दरे या गावी आले होते. मात्र एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्याने केसरकर यांना बंगल्याच्या गेटवरूनच माघारी परतावे लागले. त्यानंतर दीपक केसरकर मुंबईकडे रवाना झाले. 


मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी 5 डिसेंबरला-


महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण याचे उत्तर अद्याप मिळालेलं नाही. मात्र, महाराष्ट्राच्या 31 व्या मुख्यमंत्रिपदाचा शपथविधी सोहळा 5 डिसेंबर रोजी होणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे व महायुतीचे मुख्यमंत्री होतील, असा अंदाज राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. तर, दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यासाठी, भाजपकडून मुख्यमंत्रीपदाचा चेहरा 2 डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. भाजपचा गटनेता 2 डिसेंबरला निवडला जाणार असून दुपारी 1 वाजता विधानभवनात गटनेता निवडीसाठी भाजपची बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. 


एकनाथ शिंदे आज ठाण्यात परतणार, VIDEO:



संबंधित बातमी:


Eknath Shinde Daregaon: दीपक केसरकर दरेगावात एकनाथ शिंदेंना भेटायला गेले; गेटवरुनच माघारी परतले, नेमकं काय घडलं?