Eknath Shinde: दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) दरे गावातून ठाण्यात परतले आहेत. त्यामुळे सत्तास्थापनेला विलंब झालेल्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदेंच्या दरे गावच्या दौऱ्यामुळे महायुतीची बैठक रखडली होती. ती देखील लवकरच होण्याची शक्यता आहे. या बैठकीत मुख्यमंत्रिपदापासून अनेक महत्त्वाचे निर्णय होणार आहेत. दरम्यान, दरेगावातून ठाण्यात येताना एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी विविध प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली.
पत्रकार परषदेत तुम्ही पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी जनतेची इच्छा आहे, असं एकनाथ शिंदेंना विचारण्यात आलं. यावर मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा सहाजीकच आहे. कारण मी जनतेच्या मनामध्ये राहून काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. मला दोन उपमुख्यमंत्र्यांनीही साथ दिली. सीएम म्हणजे कॉमन मॅन...समजून मी काम केलं आहे, असं एकनाथ शिंदेंनी सांगितले. गेल्या अडीच वर्षाची आमच्या विकास कामाची ही पोच पावती आहे. जे प्रकल्प मागील अडीच वर्षांपूर्वी थांबवले होते ते वेगाने सुरू केले आहेत. आतापर्यंतचा इतिहासामध्ये विविध योजना झाल्या त्यापेक्षा सर्वात जास्त योजना आम्ही राबवले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासात या झालेल्या योजना सुवर्ण अक्षरात लिहिल्या जातील, असंही एकनाथ शिंदेंनी सांगितले.
गृह खात्याबाबत चर्चा होईल- एकनाथ शिंदे
मी गावी आल्यानंतर मला वेगळा आनंद मिळतो मला सर्वसामान्यांची गरिबीची जाणीव आहे. मी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा आहे, पण जनतेच्या मनामध्ये राहुन मी काम केलं. हे जनतेचे प्रेम आहे. कॉमन मॅन समजून मी काम केला आहे. कोणाचाही संभ्रम नको म्हणून मागील आठवड्यामध्ये मी पत्रकार परिषद घेतली आहे, असं एकनाथ शिंदे यांनी काल स्पष्ट केले. तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे जो निर्णय घेतील तो मला आणि शिवसेनेला मान्य असेल याबाबत मी आधी देखील सांगितले आहे. गृह खात्याबाबत चर्चा होईल. लोकांना जी आश्वासन दिले आहेत ती पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
5 डिसेंबरला शपथविधी-
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय. आज किंवा उद्या त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती होईल, अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुख्यमंत्री म्हणून ज्या नावाची घोषणा करतील त्याला पाठिंबा असेल असं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी आधीच जाहीर केलंय. दरम्यान 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर संध्याकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार आहे.